रत्नागिरी :  उघड्या अथांग समुद्रात दीर्घकाळ वास्तव्य करणारा आणि मानवी वस्ती असलेल्या किनाऱ्यांवर अत्यंत क्वचित दिसणारा दुर्मीळ समुद्री पक्षी ‘तपकिरी बूबी’ (ब्राऊन बूबी) गुहागर समुद्रकिनाऱ्यावर आढळल्याने पक्षीप्रेमी, निसर्ग अभ्यासक आणि पर्यावरण तज्ज्ञांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक पक्षी अभ्यासकांनी केलेल्या प्राथमिक निरीक्षणानुसार हा पक्षी ‘तपकिरी बूबी’ प्रजातीचा असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आह

सामान्यतः समुद्राच्या मध्यभागी राहून मासेमारी करणारा हा पक्षी किनारी भागात फारसा आढळत नाही. त्यामुळे गुहागरसारख्या गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यावर त्याचे दर्शन होणे ही दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण घटना मानली जात आहे. बदलती हवामान परिस्थिती, समुद्रातील वाऱ्यांचा वाढलेला वेग तसेच वातावरणातील अनपेक्षित बदल यांमुळे हा पक्षी किनाऱ्याजवळ आला असावा, असा प्राथमिक अंदाज पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

गुहागरचा समुद्रकिनारा पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखला जातो. पर्यटन हंगाम ओसरत असतानाच या दुर्मीळ समुद्री पाहुण्याने येथे हजेरी लावल्याने परिसरातील निसर्गप्रेमी, पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी ही विशेष पर्वणी ठरली आहे.

‘ ‘तपकिरी बूबी’’ हा प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सागरी प्रदेशात आढळणारा पक्षी आहे. तीक्ष्ण दृष्टी आणि समुद्राच्या उंचावरून थेट पाण्यात झेपावत मासे पकडण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शिकारी शैलीसाठी ही प्रजाती ओळखली जाते. सागरी परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या या पक्ष्याचे कोकण किनारपट्टीवर झालेले दर्शन सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने सकारात्मक संकेत मानले जात आहेत.

दरम्यान, गुहागर किनाऱ्यावर दिसलेला पक्षी खरोखरच ‘तपकिरी बूबी’ प्रजातीचा आहे का आणि त्याची प्रकृती कशी आहे, याबाबत वन विभाग तसेच स्थानिक पक्षी अभ्यासकांकडून अधिक माहिती संकलित केली जात आहे. हा पक्षी कोणत्या मार्गाने किनाऱ्यापर्यंत पोहोचला, याचाही अभ्यास सुरू असून या दुर्मीळ पाहुण्याच्या आगमनाने गुहागरच्या जैवविविधतेच्या वैभवात मोलाची भर पडल्याची भावना निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे.