रत्नागिरी: गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरात प्रशासनाच्या कथित दुर्लक्षाचा गंभीर परिणाम सोमवारी समोर आला. अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असलेला नदीवरील लोखंडी साकव अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. सोमवारी सायंकाळी गुरे नदीपलीकडून परतत असताना साकव कोसळल्याने सुमारे १५ गुरे लोखंडी गर्डरखाली अडकली होती. या दुर्घटनेत दिलीप गुरव (लिंगायत) यांचा एक बैल जागीच दगावला, तर सात गुरे जखमी झाली.

घटनेची माहिती मिळताच गावठाणवाडीसह लगतच्या वाड्यांतील ३० ते ४० ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता नदीपात्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. पावसामुळे नदीला मोठा प्रवाह असतानाही ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून कोसळलेला लोखंडी साकव बाजूला केला आणि त्याखाली अडकलेल्या १५ गुरांना सुखरूप बाहेर काढले. या धाडसी बचाव मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत शत्रुघ्न गणपत खेतले यांची पाच, सुरेश राजाराम खेतले यांची एक आणि मारुती भिवाजी खेतले यांची एक अशी एकूण सात गुरे जखमी झाली आहेत. जखमी जनावरांवर उपचार सुरू आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा साकव अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि गेल्या काही वर्षांपासून तो अत्यंत धोकादायक अवस्थेत होता. काही दिवसांपूर्वीच संबंधित विभागाने पुलाची पाहणी आणि सर्वेक्षण केले होते. नवीन पुलाचा प्रस्तावही तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच पर्यायी व्यवस्था उभारण्याचे कामही हाती घेण्यात आले होते. मात्र ती पूर्ण होण्यापूर्वीच साकव कोसळून ही दुर्घटना घडली.

विशेष म्हणजे, यापूर्वीही पुलाचा काही भाग धोकादायक झाल्यानंतर ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चाने जेसीबीच्या मदतीने साकव उचलून वेल्डिंग करत तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा नवीन पूल उभारण्यास विलंब झाल्याने अखेर ही दुर्घटना घडल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

हा पूल गावासाठी जीवनवाहिनी मानला जात होता. शेतकरी, नागरिक आणि जनावरांची दररोज या पुलावरून ये-जा होत होती. गावाच्या पलीकडील शेती तसेच स्मशानभूमीकडे जाण्यासाठीही हाच एकमेव मार्ग असल्याने पर्यायी व्यवस्था नसल्याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. या घटनेनंतर प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून तातडीने नवीन पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी आक्रमकपणे केली आहे.