scorecardresearch

लहान मुलांना करोना झाल्यास काय काळजी घ्यावी?; जाणून घ्या औषध वापराची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे

रेमडेसिवीर, स्टिरॉइड, अँटिबायोटिक्स वापराचे प्रमाण ‘आयएपी’कडून निर्धारित

लहान मुलांना करोना झाल्यास काय काळजी घ्यावी?; जाणून घ्या औषध वापराची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे
रेमडेसिवीर, स्टिरॉइड, अँटिबायोटिक्स वापराचे प्रमाण 'आयएपी'कडून निर्धारित (प्रातिनिधिक फोटो – पीटीआय)

संदीप आचार्य

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांवर होणार हे तज्ज्ञांचे म्हणणे लक्षात घेऊन ‘इंडियन अकॅडमी ऑफ पेडियॅट्रिक्स’ (आयएपी) या संघटनेने करोनाबाधित लहान मुलांच्या आरोग्याची सर्वार्थाने कशी काळजी घ्यावी याची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. रेमडेसिवीर, स्टिरॉइड, प्रतिजैविके यांचा वापर किती प्रमाणात व कधी करावा हे निश्चित केले आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी करोनाबाधित लहान मुलांवरील उपचारासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली असून ती करण्यात आयएपी ची मोठी भूमिका होती. महाराष्ट्रातही सरकारने लहान मुलांवरील उपचाराबाबत दिशा निश्चित करण्यासाठी १४ तज्ज्ञांचे कृती दल स्थापन केले असून राज्यातील करोनाबाधित मुलांवरील उपचारासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. मुंबई महापालिकेने करोनाबाधित लहान मुलांच्या उपचाराबाबत २४ विभागात आतापर्यंत दोन कार्यशाळांचे आयोजन केले असले तरी ‘आयएपी’या बालरोगतज्ज्ञांच्या देशव्यापी संघटनेचे महत्व खूप मोठे आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत तसेच एकूणच करोनाबाधित लहान मुलांवर वेळेत व योग्य प्रकारे उपचार व्हावे यासाठी संघटनेने यापूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. संघटनेच्या माध्यमातून दर आठवड्याला नियमितपणे ऑनलाईनद्वारे देशभरातील बालरोगतज्ज्ञांना उपचाराबाबत मार्गदर्शन केले जाते. ऑनलाईन बैठका तसेच वेगवेगळ्या औषधांचे परिणाम याची सातत्याने माहिती दिली जाते, असे माहीम येथील बालरोगतज्ज्ञ डॉ प्रसाद पणशीकर यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात ‘आयएपी’ सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून यात करोनाबाधित मुलांचे माईल्ड, मॉडरेट व सिव्हिअर अशी तीन गटात वर्गवारी केली आहे. १९ वर्षापर्यंतच्या मुलांना रुग्णालयात दाखल करताना तसेच रुग्णालयात कशाप्रकारे उपचार केले जावे आणि उपचारादरम्यान कोणती काळजी घ्यायची याचे सविस्तर मार्गदर्शन केल्याचे डॉ प्रसाद पणशीकर यांनी सांगितले. ताप, सर्दी, खोकला, उलट्या जुलाब, अंगावर चट्टे उठणे, ताप नाही पण अन्य लक्षणे दिसल्यास दवाखान्यात तसेच बाह्यरुग्ण विभागात पॅरासिटॅमॉल देऊन उपचार करावे मात्र प्रतिजैविके देऊ नयेत. मल्टिव्हिटॅमिन द्यावे तसेच नवजात शिशुंना माता स्तनपान करू द्यावे असे ‘आयएपी’ च्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. मॉडरेट रुग्णांमध्ये श्वासोच्छ्वास तसेच ऑक्सिजनची पातळी आणि अन्य लक्षणांचा विचार करून करावयाचे उपचार निर्धारित करण्यात आले आहेत. मॉडरेटमधील जी मुले गंभीरतेकडे वाटचाल करत असतील अशा रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित आहे. त्यातही ज्या मुलांना दमा, मधुमेह आदी त्रास असल्यास त्यांच्या चाचण्या व औषधोपचार यांचे प्रमाणही निश्चित करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णालाच केवळ रेमडेसिवीर, स्टिरॉइड आदी दिले जावे अन्य रुग्णांना म्हणजे दवाखान्यात तसेच बाह्यरुग्ण विभागात उपचार घेणाऱ्या लहान मुलांना ते दिले जाऊ नये असे ‘आयएपी’ने स्पष्ट केले आहे.

रुग्णालयात दाखल होणाऱ्या लहान मुलांना त्यांच्या वजनानुसार पाच मिलिग्रॅम प्रती किलो हा रेमडेसिवीरचा डोस सांगितला आहे. त्यापुढे तीन दिवसांपर्यंत अडीच मिलिग्रॅम प्रतीकिलो डोस दिला जावा. साडेतीन किलो ते ४० किलो वजनी गटातील मुलांसाठी रेमडेसिवीरचे हे प्रमाण असून ४० किलोपेक्षा जास्त वजनाच्या मुलांना पहिल्या दिवशी २०० मिलीग्रॅम तर दुसरा ते पाचव्या दिवसापर्यंत १०० मिलीग्रॅम डोस देण्यात यावा. स्टिरॉईड व हिपॅरीनच्या वापराचे प्रमाणही अशाच प्रकारे निर्धारित करण्यात आल्याचे डॉ अमोल अन्नदाते यांनी सांगितले. याशिवाय मिथाइल प्रीडनेसेलोन, इम्युनोग्लोब्युलीन, अॅस्पिरीन तसेच ज्या रुग्णांमध्ये रक्त गोठत असेल अशांमध्ये रक्त पातळ करण्यासाठी लो मॉलिक्युलर वेट हिपॅरीनचा वापर किती प्रमाणात करावा याचीही मार्गदर्शन तत्वे ‘आयएपी’ने निर्धारित केल्याचे डॉ अमोल अन्नदाते व डॉ प्रसाद पणशीकर यांनी सांगितले.

मुख्य म्हणजे ‘आयएपी’कडून देशभरातील बालरोगतज्ज्ञांबरोबर या उपचारासाठी नियमित मार्गदर्शन केले जात असल्याचे ठाण्यातील बालरोगतज्ज्ञ डॉ संदीप केळकर यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांची मानसिकता या काळात जपण हे एक आव्हान आहे. करोनापश्चात मुलांमध्ये होणाऱ्या बदलांकडे पालकांनी बारकाईने पाहाणे गरजेचे असल्याचे डॉ संदीप केळकर म्हणाले. प्रामुख्याने जी मुले स्वभावतः चंचल असतात अशांमध्ये नैराश्याची वा चिंता करण्याची भावना वाढत असल्यास त्यांच्याशी पालकांनी जास्तीतजास्त संवाद ठेवणे तसेच गरजेनुसार वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही डॉ केळकर यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या पातळीवरही लहान मुलांसाठी स्वतंत्र कृती समिती स्थापन करण्यात आली असून ‘आयएपी’ने करोनाबाधित लहान मुलांवरील उपचारासाठी २६ डॉक्टरांची देशव्यापी कृती समिती बनवली आहे. प्रोफेसर पियुष गुप्ता हे समितीचे अध्यक्ष असून डॉ शाम कुकरेजा , डॉ अतुल बन्सल, डॉ बसवराज जी. व्ही. यांच्यासह २६ तज्ज्ञ डॉक्टर उपचाराच्या दिशेबाबत सातत्याने आढावा घेण्याचे काम करत आहेत. लहान मुलांमधील करोना बरा झाल्यावर त्यांच्या ह्रदयाची नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. करोनातून बरे झालेल्या मोठ्यांनाही अन्य काही त्रास उद्भवताना आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम लहान मुलांच्या ह्रदयाची योग्य काळजी घेण्याला बालरोगतज्ज्ञांनी प्राधान्य दिले आहे.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास मे अखेरपर्यंत लहान मुलांमधील करोनामध्ये वाढ झालेली आढळून आलेली नाही. मात्र आरोग्य विभागाने आपल्या सर्व रुग्णालयात पुरेसे बालरोगतज्ज्ञ नियुक्तीपासून राखीव खाटा, आवश्यक उपकरणे व औषधांची तयारी करून ठेवल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या