भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी संपूर्ण राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी गुजरातचा डोळा महाराष्ट्रावर होता. त्यांनी मुंबई आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रयत्न आताही केले जात असून मुंबईतील व्यवस्था गुजरातला हलवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी आपलं मत मांडलं.

सर्व संस्थानिकांना एकत्र घेऊन एक मोठा देश निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केल्याचं पटोले यांनी जगभरातील इतर देशांचा संदर्भ देत सांगितलं. “भारताला स्वातंत्र्य मिळालं. जेव्हा नवीन भारत उभा राहिला तेव्हा तत्कालीन ब्रिटीश प्रंतप्रधान चर्चिल यांनी एक वक्तव्य केलेलं. भारत स्वातंत्र्याची ही फळ फार काळ चाखू शकणार नाही. येत्या १४-१५ वर्षांमध्येच हा देश तुकड्या तुकड्यांमध्ये पहायला मिळेल असं ते म्हणाले होते. भारतासोबत इतर अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं. नंतर त्यांचे कसे छोटे छोटे देश झाले, हुकुमशाही निर्माण झाली, हिंसाचार झाला हे आपण पाहिलं. पण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा नेहरुंनी देशाची पायाभरणी केली. त्यावेळी असणाऱ्या संस्थानिकांना एकत्र घेत एक मोठा देश निर्माण करण्याचा प्रश्न त्यावेळेचे राज्यकर्ते आणि काँग्रेसने सोडवला,” असं पटोले म्हणाले.

तसेच पुढे राज्याबद्दल बोलताना पटोले यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी संपूर्ण राज्याच्या विकासासाठी प्रयत्न केल्याचंही म्हटलं. “यशवंतराव चव्हाण यांनी संपूर्ण राज्याला विकसीत करण्याचं धोरण स्वीकारलं. त्यांनी संपूर्ण राज्याला विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेसही गुजरातचा डोळा सातत्यानं महाराष्ट्रावर रहायचा. आपली मुंबईही सोबत घेऊन जाण्याचा त्या काळात प्रयत्न झाला होता. आताही आपण पाहतोय की तेच प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील व्यवस्था गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न केला जातोय,” असं नाना पटोले म्हणाले.

राज्याला एका वाईट परिस्थितीमधून वर आणण्याचं काम काँग्रेसने केल्याचं नाना पटोले म्हणाले. अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते मूलभूत सुविधांपर्यंत सर्वच गोष्टींची उभारणी करुन राज्याला दिशा देण्याचं आणि देशाचं कॅपिटल राज्य बनवण्याचं काम काँग्रेसने केलं असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या विचारांनी महाराष्ट्र राज्य उभं राहिलं आहे, असंही नाना पटोलेंनी सांगितलं. देशाच्या एकत्रिकरणासाठी, लोकशाही टिकवण्यामध्ये काँग्रेसची फार महत्वाची भूमिका राहिली आहे. देशातल्या लोकांना लोकशाहीमध्ये सामिल करुन घेण्यामध्ये आणि लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये काँग्रेसने महत्वाची भूमिका बजावल्याचंही पटोले यांनी सांगितलं.