सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्या त्यागातून महानगर बँकेचा वटवृक्ष उभा राहिला असल्याचे गौरवोद्गार काढतानाच नम्रता, लीनता हे गुण अंगी असलेल्या शेळके यांचे कार्य तरुण पिढीसाठी दीपस्तंभासमान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेर येथे बोलताना केले.
महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव शेळके यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त महानगर परिवाराने आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळय़ात हजारे बोलत होते. आदर्श गाव योजनेचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार, महानगरचे उपाध्यक्ष सी. बी. अडसूळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके, बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते, शेळके यांच्या पत्नी सुमनताई शेळके, स्नुषा गीतांजली शेळके, माजी कुलगुरू एस. एन. पठाण, बाबाशेट कवाद, प्रभाकर कवाद आदींसह मुबई येथील नागरिकही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्घांजली वाहण्यात आली. या वेळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना ६६ हजार वहय़ांचे वाटप करण्यात आले.
शून्यातून विश्व कसे निर्माण होते हे गुलाबरावांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केल्यानेच बँकेचा वटवृक्ष झाला. राज्यातील पाच ते सहा जिल्हा बँका सोडल्या तर इतर जिल्हा बँका डबघाईला आल्या आहेत. अशा परिस्थितीत महानगर बँकेने घेतलेली भरारी वाखाणण्याजोगी आहे. शेळके आपल्या क्षेत्रात जे काम करीत आहेत तीच समाजाची व देशाची सेवा आहे, असेही हजारे म्हणाले.
पोपटराव पवार म्हणाले, महानगर परिवाराने गुलाबराव शेळके यांच्या नेतृत्वाखाली निकोप सहकारी चळवळ कशी राबवावी याचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या पारदर्शकतेचे व समाजहिताचे कौतुक म्हणजेच आजचा कार्यक्रम आहे. राज्यात सहकाराची अवस्था वाईट आहे, सहकाराचे वेगाने खासगीकरण होत आहे. पडझड होताना व बँकांचा वापर राजकीय व्यवस्थांसाठी करण्यात येत आहे, या पाश्र्वभूमीवर महानगर बँकेचे काम कौतुकास्पद आहे. महानगर बँक परिवाराने तालुक्यातील एक गाव दत्तक घेण्याचे व त्यास सर्वपक्षीय मंडळींनी पाठबळ देण्याचे आवाहन करून पवार यांनी सर्वाच्या सहकार्याने दोन वर्षांत हे गाव आपण मॉडेल म्हणून उभे करू, असेही आश्वासन दिले.
गुलाबराव शेळके म्हणाले, हजारे यांना अभिप्रेत असलेले भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे काम आमच्या बँकेत सुरुवातीपासूनच सुरू आहे. यापुढील काळातही पारदर्शक पद्घतीनेच कारभार सुरू राहील, जनतेच्या विश्वासास कधीही तडा जाऊ देणार नाही.