Gulabrao Patil On Shinde-Thackeray Shiv Sena : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं. त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाकडे अडीच वर्षे महापौरपदासाठी प्रस्ताव ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या घडामोडी सुरू असतानाच शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

‘राजकारणात काहीही होऊ शकतं, कोण कधी कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही’, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे खरंच एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले नव्हते. मात्र, आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. मग भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. या प्रश्नावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “ते दोघे (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र आले आहेत. प्रत्येकाचा विचार असतो. राजकारणात काहीच सांगता येत नाही. कोण कधी कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नसतं. त्यामुळे भविष्यवाणी मी सांगू शकत नाही”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

“आपण आता पाहत आहोत की एमआयएम कुणाबरोबर युती करत आहे, त्यामुळे राजकारणात कोणी कोणाबरोबर जाऊ शकतं हे कन्फर्म सांगू शकत नाही”, असं गुलाबराव पाटील म्हणाले. शिवसेना एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, “राजकारणात काहीही होऊ शकते.”

‘मुंबईच्या महापौरपदासाठी शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा’ : भास्कर जाधव

मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून राजकीय घडामोडी सुरू असतानाच शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी एक मोठं वक्तव्य केलं. ‘मुंबईच्या महापौरपदासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा’, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० टक्के उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा उद्धव ठाकरे हे घेतील की नाही? हा भाग नंतरचा. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून जर सांगत असाल तर तुम्ही तुमचा मान, सन्मान, गर्व, अहंकार, बाजूला ठेवत तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे”, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.