मुंबई: आखाती युद्धामुळे सरकारकडून परदेश दौरे तसेच इंधन खर्चावर मर्यादा आणण्याचे आदेश दिले असतानाच आता परिवहन विभागाच्या जाहिरात खर्चालाही चाप लावला आहे. परिवहन विभागाच्या प्रसिद्धी आराखड्याच्या खर्चात ५० टक्क्यांनी कपात करण्याच्या सूचना वित्तविभागाने दिल्यानंतर हा खर्च ४४ कोटींवरून २५ कोटींपर्यंत आणण्यात आला आहे. पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतामध्ये रस्ते अपघातात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. यासाठी परिवहन विभागाचा प्रसिद्धी माध्यम आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये चित्रपट कलाकार, खेळाडू यांच्या सहभागाने जाहिराती तयार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे वाहतूक संदेश, समुपदेशनासाठी गाणी, वृत्तपत्र, दूरचित्रवाहिन्यांवरील जाहिराती तयार केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे एस. टी. महामंडळाच्या बसेस तसेच बसस्थानकांवर इलेक्ट्रॅानिक जाहिरात फलकही लावले जाणार आहेत.

या सर्वांसाठी ४४ कोटी ७२ लाखांचा खर्च अपेक्षित होता. मात्र या प्रस्तावित खर्चाला वित्त विभागाकडून चाप लावण्यात आला. ही रक्कम २५ कोटींपर्यंत मर्यादित ठेवण्याचे वित्त विभागाकडून करण्यात आले. त्यानुसार तत्काळ या खर्चात कपात करण्यात आली आहे. हा खर्च २४ कोटी ९९ लाख ५२ हजारांवर मर्यादित करण्यात आला असून सर्वच प्रकारच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे. आता या २५ कोटी रुपयांमधून रेडीओ, टीव्ही, वर्तमानपत्र, चित्रपटगृहे. सार्वजनिक ठिकाणे, परिवहन सेवा, मेट्रो स्टेशन, एलईडी डिस्ल्पे, रोड शो, डिजिटल मिडियामधून जाहिरातील प्रसिध्द करण्यात येतील.