अलिबाग – रायगड जिल्ह्यातील गोरेगाव, माणगाव आणि कोलाड परिसरात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या कलिंगड पिकाला यंदा आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. दरवर्षी या भागातील कलिंगडांची निर्यात दुबई, मस्कत, कुवेत आणि सौदी अरेबिया या आखाती देशांमध्ये होत असते. मात्र यंदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याने येथील कलिंगड उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
रायगड जिल्ह्यातील हवामान आणि जमीन कलिंगड लागवडीसाठी पोषक असल्याने गोरेगाव, माणगाव आणि कोलाड परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड केली जाते. येथील चविष्ट आणि रसदार कलिंगडांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी असते. कोकणातील नागरीक नोकरी व्यवसायानिमित्त आखातात स्थायिक झाले आहेत. सध्या रमझानचा महिना असल्याने आखाती देशांमध्ये या कलिंगडांना चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात.
यंदा मात्र आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातीचे व्यवहार पूर्णपणे थांबले आहेत. त्यामुळे तयार झालेला माल परदेशात पाठवता आला नाही. परिणामी शेतकऱ्यांना स्थानिक बाजारावरच अवलंबून राहावे लागत आहे. स्थानिक बाजारात मात्र कलिंगडाला केवळ पाच ते सात रुपये किलो इतकाच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
शेतकऱ्यांनी कलिंगड लागवडीसाठी बियाणे, खत, औषधे, सिंचन आणि मजुरी यासाठी मोठा खर्च केला आहे. एका एकरासाठी जवळपास एक लाख रुपयांपर्यंत खर्च होत असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र सध्याच्या दरामुळे लागवडीवरील खर्चही निघणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी शेतातच तयार झालेली कलिंगडे विक्रीअभावी सडून जात आहेत, तर काढलेली फळे बाजारात कमी दराने विकावी लागत आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात कलींगडांवर भोंडया शेंडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावर औषध फवारणी करून शेतकरयांनी कसे तरी निभावून नेले. अस्मानी नंतर आता सुलतानी संकटाचा सामना इथल्या शेतकरयांना करावा लागतो आहे.
निर्यात ठप्प झाल्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक कलिंगड उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. ‘यंदा उत्पादन चांगले झाले असतानाही निर्यात बंद झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. स्थानिक बाजारात मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने मजुरीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे कलींगडे शेतात सडताहेत. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.’ – रोहन साळवी, कलींगड उत्पादक शेतकरी
