मुंबई : आखाती युद्धामुळे नैसर्गिक वायूच्या उत्पादनात झालेली घट , वाढलेला वाहतूक खर्च आणि सागरी वाहतुकीच्या विमा खर्चात चार पटीने झालेली वाढ यातून युरियाच्या आयात खर्चात गतवर्षाच्या तुलनेत ११२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डाय अमोनियम फॉस्फेटच्या आयात खर्चात ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढलेल्या आयात खर्चामुळे केंद्र सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडत असून, खतांवरील अनुदानाची रक्कम यंदा दुप्पट होण्याची भीती आहे.

आखाती युद्धाचा सर्वाधिक भीषण परिणाम जागतिक रासायनिक खतांचे उत्पादन आणि वाहतुकीवर झाला आहे. चीन आणि भारत या मोठ्या देशांसह अन्य आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांत जूनच्या सुमारास पेरण्या होतात. त्यामुळे रासायनिक खतांच्या मागणी मोठी वाढ होते. नेमक्या याच काळात आखाती युद्धामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. सागरी विमा वाहतुकीच्या रक्कमेत चार पटीने वाढ झाली आहे. युरिया खतासाठी आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या किंमतीत बेसुमार वाढ झाली आहे.

भारताला युरिया आखाती देशातून युरियाचा पुरवठा होतो. पण, आखातातील अनेक खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्खनन प्रकल्पावर हल्ले झाल्यामुळे नैसर्गिक वायूच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे खत निर्मिती कंपन्यांना नैसर्गिक वायूचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आखातातून तयार युरियाच्या आयात खर्चात ११२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर आखातातून नैसर्गिक वायू आणून देशात युरिया उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना नैसर्गिक वायूच्या दरवाढीचा फटका बसत असून, देशात उत्पादन होणाऱ्या युरियाच्या खर्चात ७० ते ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जास्तीचा दर देऊनही अपेक्षित प्रमाणात नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नसल्यामुळे देशांतर्गत युरिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. डाय अमोनियम फॉस्फेटच्या आयात खर्चात ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मे अखेर २०० लाख टनांचा साठा

देशात गतवर्षी मेअखेर १८१.२५ लाख टन खतांचा साठा होता. यंदा तो २००.६८ लाख टन इतका आहे, असा दावा केंद्रीय कृषिमंत्रालयाने दिल्लीत नुकत्याचा झालेल्या खरीप आढावा बैठकीत केला आहे. २००.६८ लाख टनांमध्ये ८०.४४ लाख टन युरिया, २१.४९ लाख टन डाय अमोनियम फॉस्फेट (डीएपी), ५८. ९३ लाख टन एनपीके खते, म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) १३.०८ लाख टन आणि सयुंक्त खते (एसएसपी) २६.७४ लाख टन खतांचा समावेश आहे. वाढीव आयात खर्चासह २५ लाख टन युरिया, १३.५० लाख टन डीएपी आयात केली आहे. तसेच रासायनिक खतांचा पुरवठा करणाऱ्या २८ देशांशी सातत्याने संपर्क सुरू आहे.

प्रश्नाची अत्यंत गाभीर्याने हाताळणी

जागतिक बाजारात रासायनिक खतांच्या किंमतीत जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे. तरीही खरीप हंगामाचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने खतांच्या आयातीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. हंगामाच्या पहिल्या टप्प्याची गरज पाहता पुरेशी खते आहेत. खत कंपन्यांनी जागतिक पुरवठादारांशी करार केलेले असल्यामुळे, या पुढील काळातही खतांची आयात होत राहील. केंद्र सरकारकडून हा प्रश्न अत्यंत गाभीर्याने हाताळत जात आहे, अशी माहिती फर्टिलायझर असोशिएशन ऑफ इंडियाचे विभागीय कार्यकारी अधिकारी सुरेश शेटे यांनी दिली.