scorecardresearch

गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी

खासदार  उदयनराजे भोसले व खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाबद्दल अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वाई : खासदार  उदयनराजे भोसले व खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाबद्दल अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अ‍ॅड. सदावर्ते यांना आज सातारा पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता सरकारी पक्षाने विविध मुद्दय़ांचा तपास करायचा असल्याचे सांगत न्यायालयाकडे १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दरम्यान, या वेळी सरकारी पक्षाचा युक्तिवाद खोडून काढत बचाव पक्षाच्या वतीने पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. युक्तिवाद सुरू असताना दोन्ही पक्षांमध्ये दोनदा खडाजंगी झाली. उदयनराजे यांचा पराभव का झाला असा मुद्दा बचाव पक्षाने मांडताच सरकारी पक्षाने त्यावर तीव्र आक्षेप घेत हे वक्तव्य मागे घेत सपशेल माफी मागण्याची मागणी केली. त्यांच्या माफीनाम्यानंतर सरकारी पक्षाने सुमोटो गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली.

सदावर्तेचे वकील महेश वासवानी मुंबईला गेल्यामुळे वकील सचिन थोरात, सतीश सूर्यवंशी, प्रदीप डोरे यांनी सदावर्तेची बाजू मांडली. त्यांच्या नोटीसचा कालावधी संपला असून सदावर्तेना ताब्यात घेणेच कायद्यात बसत नसल्याचे सांगितले. स्वत: सदावर्ते यांनी या वेळी युक्तिवाद केला. ते म्हणाले, हे प्रकरण दोन वर्षे जुने आहे. हे एवढे गंभीर असेल तर मागील दोन वर्षांपासून पोलिसांनी काय केले? या पाठीमागे राजकीय हस्तक्षेप आहे. या सर्व युक्तिवादानंतर सहावे  प्रथम न्यायदंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांनी सदावर्ते यांना सोमवापर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सुनावले. या सुनावणीवेळी शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gunaratna sadavarte police custody offensive statement police closet ysh