माथेरानचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दिलीप गुप्ता आणि त्यांच्या पत्नी विनिता गुप्ता यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ कलम ४४ (१) ई प्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे. आशा अशोक कदम यांनी दोघांचेही नगरसेवकपद रद्द व्हावे यासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. दिलीप गुप्ता आणि त्यांच्या पत्नी विनिता गुप्ता यांनी माथेरान नगर परिषदेसाठी २०११ ला झालेल्या निवडणुकीत जी शपथपत्रे दाखल केली होती, त्यात नेरळ आणि माथेरान येथील अनेक मालमत्ता दाखवल्या नव्हत्या. तसेच शपथपत्रात खोटा मजकूर दाखवण्यात आला होता. त्याचबरोबर माथेरानमध्ये दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करण्यास परवानगी नसतानाही बेकायदेशीर बांधकाम केले होते. या दोन्ही कारणांमुळे या दोघांचे नगरसेवकपद रद्द व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात आशा अशोक कदम यांनी दावा दाखल केला होता. यावर सुनावणीदरम्यान आशा कदम यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन सदर अर्ज करण्यात आला असल्याचे गुप्ता यांच्या वतीने सांगण्यात आले. १९७८ साली नगर परिषदेने जी बांधकाम परवानगी दिली होती, त्याला अनुसरूनच बांधकाम केले असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. २०११ साली नगर परिषदेने अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली असली तरी त्यावरून अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट होत नाही असा दावा गुप्ता यांच्या वतीने यावेळी करण्यात आला होता. यानंतर नगररचना विभाग आणि माथेरान नगर परिषदेला याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यात गुप्ता यांनी बाजार भूखंड क्र १५ सिसन १६२ वर अनधिकृत बांधकाम केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ कलम ४४ (१) ई प्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे. एकाच वेळी दोन नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने माथेरानमध्ये खळबळ उडाली आहे.