मुंबई : पोलिओमुक्त भारतासाठी मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन करणाऱ्या हाफकीन जीवऔषध महामंडळाचेही खासगीकरणाच्या दिशेने पाऊल पडले आहे. हाफकीनमध्ये निर्माण होणाऱ्या आणि लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या त्रिगुणी लसीचे उत्पादन आता खासगी कंपनीला देण्यात येणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने हाफकीनला लस निर्मितीसाठी दिलेले लसीचे संयुग (सीड स्ट्रेन) खासगी कंपनीला देऊन त्याचे उत्पादन त्या कंपनीकडे सोपवले जाण्यासाठी स्वारस्य पत्र मागविण्यात आले आहे. विशेष म्हणजे यासाठी देशातील मुंबईस्थित एका बड्या उद्योग समुहाने स्वारस्य दाखवले आहे. आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी मिळत नसल्याने हाफकीनवर ही वेळ आली आहे.

लहान मुलांना पोलिओप्रमाणेच घटसर्प, डांग्याखोकला आणि धनुर्वात होऊ नये यासाठी त्रिगुणी लस दिली जाते. ही त्रिगुणी लस बनविण्याचे सर्व अधिकार देशात केवळ हापकीन या संस्थेकडे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या मानकानुसार अद्ययावत नसल्याने हे उत्पादन बंद करावे लागले.

दरम्यानच्या काळात पोलिओमुक्त भारतासाठी पोलिओसाठीची प्रयोगशाळा अद्ययावत करण्यात आली. मात्र त्रिगुणी लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळेचे अद्ययावतीकरण मात्र निधीअभावी रखडले. गेली २४ वर्षे या प्रयोगशाळेच्या अद्ययावतीकरणासाठी सरकारकडे निधीच उपलब्ध झाला नाही. अखेर ही लस आता खासगी कंपनीकडून तयार करून घेण्यासाठी ‘हाफकीन’कडून जाहिरात देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर समितीने हाफकीनसंदर्भात तयार केलेल्या अहवालात त्रिगुणी लसीचे उत्पादन अन्य कंपन्यांना देण्यापेक्षा येथेच आधुनिकीकरण करून पंचगुणी लसीचे उत्पादनही हाफकीनने करावे अशी शिफारस केली होती. मात्र या शिफारसीला केराची टोपली दाखविण्यात आली असून सरकारकडूनही कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.

अजित पवारांनी जागा विक्रीचा प्रस्ताव फेटाळला

मुंबईत परळ येथे हाफकीनची ३२ एकर जागा आहे. त्यापैकी पाच एकर जागा ही टाटा रुग्णालयाला रुग्णालय उभारण्यसाठी देण्यात आली. त्याचप्रमाणे एक एकर जागा भारतीय वैद्यकीय संशाोधन परिषद (आयसीएमआर) ला देण्यात आली.

सध्या हाफकीनकडे केवळ २७ एकर जागा उरली असून मुंबईच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ही जागा आहे. याआधी पिंपरी चिंचवड येथील हाफकीनच्या जागेच्या विक्रीचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळला होता. ‘हाफकीन’ला संजीवनी देण्यासाठी त्यांनी निधी देण्याचीही तयारी दर्शविल्याचे संचालक सदस्यांकडून सांगण्यात आले.

पोलिओ, सर्पदंश, विंचूदंश तसेच २२ गोळ्यांचे उत्पादन

सध्या हाफकीनमध्ये पोलिओ लसीचे उत्पादन केले जात आहे. ही पोलिओ लस भारताप्रमाणेच परदेशातही पाठविली जाते. सर्व सरकारी रुग्णालये तसेच दवाखान्यांत बालकांना ही मोफत दिली जाते. त्याचप्रमाणे सर्पदंश, विंचूदंशावरील लसीचे उत्पादन पिंपरी चिंचवड येथील शाखेत करण्यात येत असून जीवनदान देणाऱ्या या लसी आहेत. त्याचप्रमाणे ॲझिथ्रोमायसीन, मेटफॉर्मिन, खोकल्यावरील कॉपिकिन सिरप अशा जीवनावश्यक २२ प्रकारच्या गोळ्यांचे उत्पादन हाफकीनमध्ये होत असून सर्वसामान्यांना सरकारी रुग्णालयात मोफत या गोळ्या उपलब्ध आहेत.

खासगीकरणाची भीती, न्यायालयात दाद मागणार

हाफकीनकडून पहिल्यांदाच अन्य कंपनीला उत्पादन करण्यासाठी लसीचे संयुग दिले जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये हाफकीनच्या खासगीकरणाची भीती निर्माण झाली आहे. या संस्थेमध्ये सध्या ४५० कर्मचारी कार्यरत असून खासगीकरणामुळे या सर्वांवर बेरोजगारीची कुऱ्हाड येणार आहे.

पहिल्या टप्प्यात त्रिगुणी लसीचे संयुग रिलायन्सला देतील नंतर हाफकीनची पोलिसो लस, इतर औषधे आणि कालांतराने संपूर्ण हाफकीनच रिलायन्सच्या ताब्यात देण्याची भीती आहे. याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी करीत असल्याचे हाफकीन बायो फार्मास्युटिलकल काँर्पोरेशन युनियनचे अध्यक्ष गोविंद मोहिते यांनी सांगितले.

टाटा रुग्णालयाला जागा दिल्यानंतर हाफकीन जीव औषध महामंडळाला १०० कोटींचा निधी उपलब्ध होणार होता. मात्र तो उपलब्ध झालेला नाही. हाफकीन महामंडळाच्या अद्ययावतीकरणासाठी १५० कोटींचा निधीही सरकारकडून प्रस्तावित आहे. मात्र तो निधीही अद्याप उपलब्ध झालेला नाही. याआधी एकदाच ५० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. सरकारने अन्य कंपनीला त्रिगुणी लसीचे संयुग देऊन लसीचे उत्पादनाची परवानगी देण्यापेक्षा आधुनिकीकरण करावे. – दीपक पेडणेकर, कर्मचारी प्रतिनिधी, संचालक मंडळ हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ मर्यादित.

हाफकीनकडून त्रिगुणी लसीचा नमुना विकला जाणार नाही तर ही लस तयार करण्यासाठी स्वारस्य निविदा काढण्यात आली आहे. यासाठी रिलायन्सने स्वारस्य दाखवले आहे. मात्र कोणतीही प्रक्रिया अद्याप अंतिम झालेली नाही. अंतिम निर्णय हा शासनाचा आहे. हाफकीनकडे निधीची कमतरता असल्याने अन्य कंपनीच्या समन्वयाने भागीदारीतून ही लस तयार करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये स्वामीत्व हक्कापोटी हाफकीनला निधी मिळणार आहे. शिवाय त्या कंपनीच्या लसीवर हाफकीनचे नाव असणार आहे. – सुनील महिंद्रकर, व्यवस्थापकीय संचालक, हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ.