Bakri Eid Nitesh Rane Controversy: बकरी-ईदबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजपा नेत्यांमध्येच जुंपल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. “नितेश राणे यांनी त्यांच्या मटणाच्या दुकानाकडे लक्ष द्यावे, बकरी-ईदच्या सणाला मंत्र्यांनी अशी वक्तव्य करु नयेत”, अशा शब्दात मुंबईचे भाजपा नेते हाजी अराफत शेख यांनी नितेश राणे यांना घरचा आहेर दिला आहे. शेख यांनी राणे यांना बकरी-ईदच्या निमित्ताने दावतचे आमंत्रण देखील दिले.
नारायण राणे मटणाच्या दुकानामुळेच मंत्री झाले – हाजी अराफत शेख
हाजी अराफत शेख नितेश यांच्यावर टीका करताना त्यांच्या मटणाच्या दुकानाचा दाखला दिला. “मंत्री नितेश राणे यांचे देखील मटणाचे दुकान आहे. नारायण राणे मटणाच्या दुकानामुळेच मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले आणि केंद्रात देखील मोठ्या पदावर पोहोचले”, असे शेख म्हणाले. दिल्लीत नारायण राणे दुकानाबद्दल आणि बकऱ्या पाळणाऱ्यांच्या समस्या काय आहेत याबाबत सांगायचे असेही शेख म्हणाले. चेंबूरमध्ये राणेंच्या आईच्या नावाने असलेल्या हॉटेलमध्ये मांसाहारी पदार्थ मिळतात. राणेंनी त्यांच्या मटणाच्या दुकान आणि हॉटेलकडे लक्ष द्यावे, असा सल्ला शेख यांनी दिला.
नितेश राणेंवर टीका
कागदावरुन टीका करताना, “राणे रविवारी मटण खात असतील तर त्यांनी मटणाऐवजी कागद खाऊन पाहावे, कशी चव लागते?”, असा टोला हाजी शेख यांनी लगावला. “तुमच्याच हॉटेलमध्ये एकदा कागदाचा पदार्थ खाऊन पाहा, नितेश राणे मत्स्य खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी अशा गोष्टी न बोलता आम्हाला पाठिंबा द्यायला हवा. रस्त्यांवर बकऱ्यांचा गाड्या अडवल्या जात आहेत. त्यामुळे हिंदू खाटीक समाज, धनगर, मुस्लिम, कुरेशी समाज त्रस्त आहे. मंत्रीच अशी वक्तव्य करत असेल तर आमच्यासाठी कोण उभं राहणार असा सवाल हे समाज विचारत आहेत”, असे शेख म्हणाले.
नारायण राणे यांच्याकडून ज्ञान घेण्याचा सल्ला
“तुम्ही तुमच्या दुकानावर, हॉटेलमध्ये वर्षभर खूप पैसे कमावता मग आमच्याही पोटाचा विचार करा”, असे शेख नितेश राणेंना उद्देशून म्हणाले. “स्वत: या खात्याचे मंत्री आहेत, ज्यांचे स्वत:चे मटणाचे दुकान आहे त्यांनी आमचाही हिताचा विचार करावा”, असे आवाहनही शेख यांनी केले. शेख यांनी नितेश राणे यांनी वडील नारायण राणे यांच्याकडून ज्ञान घेण्याचा सल्लाही दिला. मोठ्या पदावर गेल्यानंतर अशाप्रकारची वक्तव्य करु नयेत असे सांगत शेख यांनी नितेश राणे यांना बकरी ईदला घरी दावतीसाठी आमंत्रणही दिले. हाजी अराफत शेख कागदी नव्हे तर ओरिजनल बकरा खायला घालणार, असा खोचक टोला त्यांनी राणेंना लगावला.
