scorecardresearch

अर्धा हंगाम संपला तरी ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत

या वर्षीचा हंगाम अर्ध्याहून अधिक संपला, परंतु ऊस उभाच असल्याने आणि उसाला तुरे आल्याने शेतकरी अडचणीत आहे.

विश्वास पवार, लोकसत्ता

वाई : सातारा जिल्ह्यात ऊस क्षेत्र वाढल्याने व साखर कारखान्यांच्या मनमानीमुळे जिल्ह्यातील ५० टक्के ऊस तोडणीअभावी शेतात उभा आहे. गावागावांत उसाचे फड तोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. या वर्षीचा हंगाम अर्ध्याहून अधिक संपला, परंतु ऊस उभाच असल्याने आणि उसाला तुरे आल्याने शेतकरी अडचणीत आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम ऑक्टोबर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ामध्ये सुरू झाले. या वर्षी जिल्ह्यात दीड ते पावणेदोन कोटी टनांची नोंद त्या त्या सहकारी व खासगी साखर कारखान्यांकडे झाली आहे. साताऱ्यात सात सहकारी व सात खासगी असे १४ साखर कारखाने आहेत .यातील किसन वीर सातारा, खंडाळा तालुका शेतकरी, प्रतापगड सहकारी हे तीन कारखाने बंद आहेत. यामुळे उत्तर सातारा जिल्ह्यातील व माण तालुक्यातील शेतकरी ऊस गाळपाला न गेल्यामुळे व उसाला तुरे आल्याने वजनात घट होत असल्याचे दिसत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मागील तीन-चार वर्षांत पाऊस चांगला असल्यामुळे जिल्ह्यात विक्रमी ऊस लागवड झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच सहकारी व खासगी कारखाने मागील वर्षांपर्यंत सुरू होते. परंतु या वर्षी काही अडचणीमुळे तीन कारखाने बंद आहेत. त्यामुळे या वर्षी ऊस गळितास जाणार की नाही या चिंतेने या कारखान्यांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मोठय़ा कष्टाने दिवस-रात्र कष्ट करून तोडणीस आलेला ऊस पाठवायचा कोठे, हा मोठा प्रश्न जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतामध्ये मागील सतरा-अठरा महिन्यांपासून ऊस उभा आहे. त्यातच आजच तोड येईल, उद्या तोड येईल या आशेवर शेतकऱ्यांनी मागील महिना-दीड महिना उसाला पाणीही दिले नाही. त्यामुळे ऊस वाळून चालला आहे. उसाला तुरे आल्याने वजन कमी होऊन ऊस पोकळ होत आहे. 

साताऱ्यात कृष्णा सहकारी, रेठरे (गाळप क्षमता ७२००), सह्याद्री सहकारी, कराड (७५००), अजिंक्यतारा सहकारी, सातारा (४५००), श्रीराम सहकारी, फलटण (२५००), बाळासाहेब देसाई, पाटण (१२५०), रयत सहकारी (२५००), गुरु कमोडिटी (जरांडेश्वर शुगर) कोरेगाव (१०,०००), शरयू एग्रो (५०००), स्वराज इंडिया (५०००), खटाव-माण तालुका एग्रो (२५००), ग्रीन पॉवर शुगर, खटाव (३५००), जयवंत शुगर, कराड (५५००), दत्त इंडिया फलटण (३०००), विश्वजीत कदमांनी त्यांच्या सोनहिरा कारखान्याच्या काही टोळय़ा वाई तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे पाठवल्या आहेत. या कारखान्यांमधून क्षमतेपेक्षा जास्त गाळप होत आहे. तरीही उसाचा उरक होताना दिसत नाही. ज्यांच्या शेतात ऊस उभा आहे असे शेतकरी दररोज ऊस तोडणी अधिकारी, स्लीप बॉय आदींची आर्जवे करत आहेत. मात्र ऊस तोडण्यासाठी टोळी वा मशीन मिळायला तयार नाही. टोळी मिळाली तर तोडणीसाठी मोठय़ा रकमेची मागणी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे.  कराड, पाटण, सातारा, खटाव, माण, फलटण, कोरेगाव तालुक्यांमध्ये जवळपास पन्नास-पंचावन्न टक्क्यांच्या आसपास ऊसतोड झाली आहे. वाई, जावळी, खंडाळा आदी तालुक्यांत ऊसतोडणी ठप्प आहे. या तालुक्यांत आतापर्यंत फक्त चाळीस टक्के उसाची तोड झाली आहे. यामुळे ऊस तोडणीची जिल्ह्यातील सर्व यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसत असून याकामी जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे. 

साताऱ्यातील शेतकरी हवालदिल किसन वीर साखर कारखान्याच्या आधिपत्याखालील किसन वीर सातारा सहकारी, खंडाळा तालुका सहकारी व प्रतापगड सहकारी असे तीनही कारखाने या वर्षी बंद आहेत. या परिसरात या वर्षी पंधरा लाख टन उसाची नोंद होते. यामुळे या परिसरातील पाच तालुक्यांतील शेकडो हेक्टर ऊस अदयाप शेतामध्ये उभा आहे. वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांत गावागावात ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत आहे. यंदाचा हंगाम अर्ध्याहून अधिक झाला, तरीही ऊसतोड येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या परिसरातील तीनही कारखाने सुरू होण्याची शक्यता नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. या तालुक्यातून जरंडेश्वर, शरयू, स्वराज इतर खासगी कारखाने ऊस गाळपासाठी घेऊन जात आहेत. मात्र या परिसरात ऊस टोळय़ा वाढल्याशिवाय उसाचे गाळप होणार नाही. त्यातच या परिसरातील गुऱ्हाळ घरे बंद आहेत. या परिसरात दहा लाख टन ऊस गाळपअभावी शेतात उभा आहे. त्यामुळे तोडणीस आलेला पाऊस कुठे पाठवायचा अशा विवंचनेत शेतकरी आहेत. याकामी साखर आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप करून ऊस तोडणी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Half of the season over sugarcane still in fields zws

ताज्या बातम्या