लोकसभेत काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या असल्या, तरी विधानसभेत आम्ही दुप्पट जागा मागत नाहीत. आम्ही निम्म्याच जागा मागतो आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही अजून किती दिवस अडवून धरायचे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली. आपण जातीयवादी नसून सत्यवादी असल्याची मल्लिनाथी करतानाच पवार यांनी, गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला साधा धक्का लागला असताना त्यांचा मृत्यू कसा झाला, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळले पाहिजे, असे वक्तव्य या वेळी केले.
राष्ट्रवादीच्या लातूर जिल्हा शाखेतर्फे दयानंद सभागृहात आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री सुरेश धस, माजी खासदार जनार्दन वाघमारे, गणेश दुधगावकर, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, बाबासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष डी. एन. शेळके आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत देशभर सुनामी लाट आल्यासारखी स्थिती होती. या लाटेत तमिळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांतील मतदारांनी चांगली भूमिका वठवली. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी मात्र लाटेवर स्वार होणे पसंत केले. मात्र, दोनच महिन्यांत देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेवर आले, त्यांनी या आश्वासनांना हरताळ फासला. शेतीमाल हमीभावात काही बदल झाला नाही. शेतकरीविरोधी धोरणे केंद्र सरकार राबवत आहे. शेतकऱ्यांच्या घरात अच्छे दिन येणार नाहीत याची काळजी घेत आहे. भाजप-शिवसेनेच्या मंडळींना निवडून येण्यासाठी बहुजन चेहरा लागतो. सत्तेवर आल्यावर मात्र वेगळीच मंडळी सत्तेची फळे चाखतात. बोलणाऱ्यांचे गहू विकतात, न बोलणाऱ्यांचे काहीही विकत नाही हे लक्षात घेऊन तटकरे यांनी काँग्रेसची मंडळी निवडणुकीपुरते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वापरून घेतात व नंतर खडय़ासारखे बाजूला सारतात याबद्दल नापसंती व्यक्त केली. मांजरा धरणातील बंधारे बांधण्यात निम्मे यश अजित पवार यांचे असल्याचेही ते म्हणाले. धस यांनी ‘दादा तुम्ही फक्त लढ म्हणा, लातूर जिल्हय़ातील सहाही विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास सिद्ध आहे,’ असे सांगितले.
‘२५ टीएमसी पाण्याची कामे लवकरच’
उस्मानाबाद – केंद्र सरकारचा निधी, तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे नियम व अटींमुळे मध्यंतरीच्या काळात अडचणी आल्या. पर्यावरण विभागाने सिंचन प्रकल्पांना आक्षेप घेतला. त्यांच्या नियम, अटींची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जलसंपदा विभाग ती लवकरच पूर्ण करील व मराठवाडय़ाच्या हक्काच्या २५ टीएमसी पाण्याची कामे सुरू होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी निर्धार मेळाव्यानंतर पत्रकार बैठकीत पवार बोलत होते. ते म्हणाले की, सोयाबीन बियाण्याची सर्वत्र तक्रार होत आहे. त्यामुळे बियाणे न उगवलेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य बँकेकडून जिल्हा बँकेला चांगला अधिकारी कार्यकारी संचालक म्हणून देण्याच्या सूचना केल्या आहेत. भागभांडवल देण्यासंदर्भातही चर्चा करून निर्णय घेतला जाईल. धनगर समाजाच्या मागण्यांचा विचार करून केंद्राकडे शिफारस केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. येळ्ळूरप्रकरणी कर्नाटक सरकारचा पवार यांनी निषेध केला. महाराष्ट्र सरकारने तेथील जखमींना प्रत्येकी १ लाखाची मदत जाहीर केली आहे. राज्याचे तीन मंत्री जाऊन ती मदत देणार असल्याचे स्पष्ट करुन पवार म्हणाले की, सीमाप्रश्नावर पंतप्रधानांना शिष्टमंडळ भेटले आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. महाराष्ट्र सरकार सीमाबांधवांच्या सोबत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल, माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, माजी मंत्री राणाजगजीतसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, आमदार विक्रम काळे आदींची उपस्थिती होती.