भंडारद-यात दिवसभरात अर्धा टीएमसी भर

मुळा-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आषाढसरींची गती आणि तीव्रता आता अधिकच वाढली असून आज दिवसभर जोरदार सरी कोसळत होत्या. या बहारदार पावसामुळे भंडारदऱ्याच्या पाणीसाठय़ात अवघ्या चोवीस तासांत अर्धा टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची भर पडली.

मुळा-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आषाढसरींची गती आणि तीव्रता आता अधिकच वाढली असून आज दिवसभर जोरदार सरी कोसळत होत्या. या बहारदार पावसामुळे भंडारदऱ्याच्या पाणीसाठय़ात अवघ्या चोवीस तासांत अर्धा टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची भर पडली. मुळा नदीही अधिकच जोमाने वाहू लागली. कृष्णावंतीवरील वाकीचा तलाव निम्म्यापेक्षा अधिक भरला. शुक्रवारीही प्रवरेच्या उगमस्थानाजवळ रतनवाडी येथे सर्वाधिक म्हणजे १४१ मिमी पाऊस पडला.
तालुक्याच्या पश्चिम भागातील कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड परिसरात शुक्रवारी पावसाचा जोर खूपच वाढला. भंडारदरा धरणाच्या पाणीसाठय़ात चोवीस तासांत ५२२ दशलक्ष घनफुटाने वाढ झाली. आज सायंकाळी धरणातील पाणीसाठा १ हजार ७४१ दशलक्ष घनफूट होता. पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असणारे भंडारदऱ्याचे आवर्तन आज दुपारी बंद करण्यात आले. भंडारदरा परिसरात अवघ्या बारा तासांत तेथे ४१ मिमी पावसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रात सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे- घाटघर १००, पांजरे ५५, रतनवाडी १४१, भंडारदरा ७१.
पाणलोट क्षेत्राबाहेर कळसूबाईच्या पायथ्याशी असणाऱ्या वाकी येथे आज ८६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. सातत्याने तीन दिवस कळसूबाई शिखर परिसरात पडत असणाऱ्या पावसामुळे कृष्णावंती या प्रवरेच्या उपनदीवरील वाकी लघुपाटबंधारे तलावात पाण्याची चांगली आवक होत असून हा तलाव निम्म्यापेक्षा अधिक भरला आहे. उद्या (शनिवार) हा तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कृष्णावंती वाहती होईल. निळवंडे धरणातही नव्याने पाणी येण्यास सुरुवात होईल. हरिश्चंद्रगड परिसरातील आज दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे मुळा नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली. आज सकाळी कोतूळजवळ मुळा नदीतून ४ हजार २०० क्युसेक पाणी वाहात होते. दिवसभरात त्यात सातत्याने वाढ सुरू होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Half tmc increase in bhandardara dam