चंद्रपूर : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळख असलेला राखीचा सण मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो, परंतु राखी निर्मितीसाठी मोठय़ा प्रमाणात पर्यावरणाला घातक अशा प्लास्टिकचा वापर होतो. म्हणूनच पर्यावरणस्नेही बांबू राखी निर्मितीचा संकल्प करून बाबुपेठ परिसरातील १२ अपंग महिला व पुरुषांनी वैशिष्टय़पूर्ण अशा बांबू राखी बनवण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. ज्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या महत्त्वपूर्ण संदेशासोबतच बांबू राखीमुळे अपंगांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे.

बांबूटेक ग्रीन सव्‍‌र्हिसेसचे संचालक व दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष नीलेश पाझारे यांच्या संकल्पनेतून सदर सामाजिक उपक्रमाची मुहूर्तमेढ झाली.

अपंगांना चिचपल्लीजवळ स्थित बांबूटेकच्या कार्यशाळेत बांबू राखी निर्मितीसाठी तसेच बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले. या बांबूच्या निर्मितीसाठी बांबूसोबतच पर्यावरणपूरक वस्तूंचा उपयोग करण्यात आला आहे. वैशिष्टय़पूर्ण अशा बांबू राखीची विक्री सुद्धा स्वत: अपंगांचे एक पथक बनवून करीत आहे. पर्यावरणपूरक बांबू राखीला चांगलीच मागणी असून समाजातील संवेदनशील व्यक्ती व संस्था या राखीची खरेदी करून अपंग आत्मनिर्भरतेच्या या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाला सहकार्य करीत आहे.

हैदराबाद, सोलापूर, पुणे, गडचिरोली आणि नागपूर आदी शहरातून बांबू राखीची मागणी येत आहे. चंद्रपूर शहरात सुद्धा अनेक ठिकाणी बांबू राखी विकृतीचे स्टॉल लागणार असून चिनी वस्तू व राखीच्या बहिष्कारानंतर स्थानिक दिव्यांग बांबू कारागिरांद्वारा बांबूपासून निर्मित बांबू राखीने भारतीयांना एक पर्यावरणपूरक पूर्णत: भारतीय राखीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पर्यावरणस्नेही बांबू राखी निर्मितीच्या सामाजिक उद्यम स्वरूपातील प्रकल्पात स्वत: अपंग असलेले नीलेश पाझारे यांच्या नेतृत्वात सतीश मुल्लेवार, मुन्ना खोब्रागडे, रूपेश रोहणकर, रवींद्र उपरे, सतीश कोलते, कल्पना शिंदे, दर्शना चाफले, भाग्यश्री कोलते, किरण करमणकर हे बांबू कारागीर राखी बनवण्यापासून ते विक्रीपर्यंतचे कार्य करीत आहे. आत्मनिर्भर दिव्यांग या संकल्पनेला सक्रिय सहकार्य  करण्याचे आवाहन बांबूटेक ग्रीन सव्‍‌र्हिसेस आणि दिव्यांग कौशल्य विकास संस्थेच्या वतीने नीलेश पाझारे, अन्नपूर्णा धुर्वे (बावनकर) यांनी केले आहे.