मुंबई: तुमच्या घरात काही जुने पुराणे कागदपत्र वस्तू आहेत का? तुमच्या आई वडिलांनी आजी आजोबांनी, खापर पणजोबाने माळ्यावर काही जपून ठेवले आहे का? तुमच्या गावात असे काही पुरातन आहे का? मग एक मे पासून त्याची नोंदणी करा. हस्तलिखित दस्तऐवजांच्या स्वरूपात असलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने डिजिटल नोंदणीचा उपक्रम सुरू केला आहे. या नोंदणीसाठी ‘हर घर दस्तक’ ही विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेच्या निमित्ताने राज्यातील हस्तलिखित दस्तऐवजांच्या ऑनलाईन नोंदीतून सांस्कृतिक वारसा जगासमोर आणा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांनी केले आहे.

पू. ल. देशपांडे कला अकादमीच्या सभागृहात हस्तलिखित दस्तऐवजीकरणावर एक बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, देशभरातील हस्तलिखित दस्तऐवजांचे जतन आणि डिजिटलायझेशन करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी ‘ज्ञानभारती ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून राज्यातील हस्तलिखित दस्तऐवज डिजिटल स्वरूपात जतन केले जाणार आहेत. भारताचा प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.

१ मे रोजी ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून, राज्यातील सर्व ग्रामसभेत हस्तलिखित नोंदणीचा विषय प्राधान्याने मांडण्याचे निर्देशही ॲड शेलार यांनी देत गावपातळीवरील हस्तलिखित स्वरूपातील स्थानिक वारसा जतन करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले.

स्थानिक पातळीवर हस्तलिखित दस्तऐवज उपलब्ध असलेल्या विविध संस्था, ऐतिहासिक घराणी, नागरिक, संघटना आणि कुटुंबे यांची पुढील ७ दिवसात जिल्हा व तालुकास्तरीय सविस्तर यादी तयार करण्यात यावी. यादी तयार झाल्यानंतर संबंधितांशी संपर्क साधून त्यांच्याकडील दस्तऐवजांची माहिती घेत ‘ज्ञानभारती’ ॲपवर त्यांची नोंदणी करावी. या नोंदणी प्रक्रियेत दस्तऐवजांची मूळ मालकी संबंधित संस्था, घराणी किंवा नागरिकांकडेच कायम राहील. केवळ दस्तऐवजांचे जतन करणे हाच या उपक्रमाचा मूळ हेतू आहे, असे ॲड शेलार यांनी स्पष्ट केले. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, संचालक विभीषण चवरे, उपसचिव श्री सामंत आदी उपस्थित होते.