शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेतील एकनाथ शिंदे तसेच जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे ठाकरेंना हा निर्णय घ्यावा लागला आहे. परिणामी, महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार व्हावे लागले. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांचे आभार मानले आहेत. कठीण परिस्थीतही शरद पवार आणि काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो अशा आशयाचे ट्वीट राऊत यांनी केले आहे.


मी शरद पवार यांचे आभार मानतो. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले. मार्गदर्शन केलं.स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजींच्या मागे ठामपणे उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली. सत्ता येते सत्ता जाते. अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही! असे ट्वीट राऊत यांनी केले आहे.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर सरकार कोसळले
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार बुधवारी रात्री कोसळले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील शक्तिपरीक्षा मात्र टळली. या घडामोडींनंतर भाजपच्या वतीने सरकार स्थापण्यासाठी आजच दावा केला जाणार आहे.