फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत म्हणून पत्नीचा छळ केल्याच्या आरोपावरुन न्यायालयाने सुरेश सदाशिव सोनवणे (वय ४०, रा. पुणे) याला दोन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी दोन महिने कारावास अशी शिक्षा दिली.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली वाघमोडे यांनी या खटल्याचा निकाल दिला. नगर शहरातील अनिता हिचा विवाह २६ जुन २००६ रोजी झाला होता. अनिता हिने वडिलांच्या मिळकतीत वाटा मागावा व फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत यासाठी सासरी छळ होत होता. याच त्रासाला कंटाळून तिने विवाहानंतर वर्षभरातच विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र ती त्यातून बचावली. त्यानंतर तिला मुलगी झाली, तरीही तिचा छळ सुरुच होता. परंतु २२ सप्टेंबर २००९ रोजी तीला मुलीसह घराबाहेर काढण्यात आल्याने तिच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या खटल्यात सरकारतर्फे सरकारी वकिल फिरोज शेख यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले.