महाराष्ट्रात सध्या चर्चेत आहे तो टिपू सुलतानचा विषय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष मानलं पाहिजे असं म्हटलंं होतं. त्यावरुन हा वाद सुरु झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी जी प्रतिक्रिया दिली त्याबाबत आज संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. तुम्हाला टिपू सुलतानला नायक मानणारा पाकिस्तान कसा चालतो? पाकिस्तानशी क्रिकेट खेळणं बंद का करत नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तर जयंत पाटील यांनी सुनेत्रा वहिनींच्या मार्गात अडथळे आणणार नाही असंही म्हटलंं आहे. जाणून घेऊ दिवसभरातली पाच वक्तव्यं काय.
सुनेत्रावहिनींबाबत काय म्हणाले जयंत पाटील?
राजकारणात उद्या काय होईल हे आज सांगता येत नाही. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर हे पुन्हा सिद्ध झालं आहे. आजचा दिवस उद्या आहे का? हे नियतीला मान्य आहे का? शरद पवार हे आमचं नेतृत्व करत आहेत. शेतकऱ्यांच्या समोर काही आव्हानं निर्माण होणार आहे. देशाच्या आर्थिक स्थितीचे बरेच प्रश्न आहेत. आमचा पक्ष त्या अनुषंगाने विचार करेल. विलीनीकरणाबाबत काही भाष्य करावं असं मला वाटत नाही. ज्यांच्याशी आमची चर्चा झाल्याने कुणी काय बोललं त्यावर काय उत्तर देणार? सुनेत्रा वहिनींना आम्ही चार ते पाच जण जाऊन भेटलो. तुम्ही काहीही अडचण असेल तर आम्हाला सांगा. सुनेत्रा पवार असोत किंवा पार्थ पवार यांच्यासाठी अडथळे आणि प्रश्न निर्माण करण्याची इच्छा नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानणारा देश-संजय राऊत
देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतानचा विषय काढला. त्याचं उदात्तीकरण वगैरे म्हणाले. पाकिस्तान टिपू सुलतनला नायक मानतं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तसा पाकिस्तानमधे टिपू सुलतान नायक आहे. त्या पाकिस्तानबरोबर जर भारत क्रिकेट खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतर नेत्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे. पाकिस्तानमधे टिपू सुलतानवर धडे आहेत, पुतळे आहेत. त्यांच्यासाठी तो योद्धा आहे. असं असेल तर मग देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती उचबंळून वर आली आहे तर मग त्यांनी पाकिस्तानसह क्रिकेट खेळणार नाही हे सांगितलं पाहिजे पण हे सांगणार नाहीत कारण ते ढोंगी लोक आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवरायांची तुलना कुठल्याच राजाशी होऊ शकत नाही-नाना पटोले
हर्षवर्धन सपकाळ काय बोलले मला माहित नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्याही राजाशी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज देशात नव्हे तर जगात महान आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी दिलीय. टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केलं आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेलं पाहिजे, असे मत त्यांनी मांडले होते, त्यावर आता नाना पटोलेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी काय म्हटलं?
“माझ्या वक्तव्याची मोडतोड करून “ध” चा “मा” करून देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असे मी सांगितले होते, त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला. पुण्यातील भाजपाचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले व त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. भाजपाच्या या गुंडगिरीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पुणे पोलिसांनी दंगलखोर भाजपा गुंडाना चिथावणी देणाऱ्या धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपाच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
रविंद्र चव्हाण यांचीही सपकाळांवर टीका
मालेगावच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण चांगलंच तापलं आहे. हिंदूत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. तर दुसरीकडे यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं विधान केलं आहे. ‘टिपू सुलतान यांनी कधीच विषारी, विखारी विचारांना थारा दिला नाही. त्यामुळे टिपू सुलतान यांना शौर्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे’ असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सूलतान यांची तुलना छत्रपती शिवरायांसोबत केल्यामुळे आता भाजप चांगलंच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील ट्विट करत सपकाळ यांच्यावर आणि काँग्रेसवर टीका केली आहे. ‘काशी की कला जाती, मथुरा भी मस्जिद होती, शिवाजी ना होते, तो सुन्नत सबकी होती… अठरा पगड जातीधर्मांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य उभारलं ते रयतेच्या सुखासाठी आणि देव-देश-धर्माच्या रक्षणासाठी. अशावेळी केवळ स्वतःचे संस्थान वाचवण्यासाठी ब्रिटीशांशी लढणारा, मंदिरं फोडणारा आणि हिंदूवर अनन्वित अत्याचार करणारा टिपू सुलतान शिवरायांच्या समकक्ष कसा असू शकतो? असे विचार फक्त काँग्रेसच्याच मोगलाई मानसिकतेतून येतात. असं म्हणत रविंद्र चव्हाण यांनी सपकाळांवर टीका केली आहे.

