Haribhau Bagade Rajasthan Governor : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी (२७ जुलै) देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांची अदलाबदली केली आहे. तसेच भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही ज्येष्ठ नेत्यांची वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या नव्या आदेशांनुसार झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल बनणार आहेत. राधाकृष्णन हे आता रमेश बैस यांची जागा घेतील. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली होती आता राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. बागडे हे गेल्या ६५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर बागडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बागडे म्हणाले, काल (२७ जुलै) सकाळी ८.४५ च्या सुमारास मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला. पंतप्रधान मला म्हणाले, हरिभाऊ काय चाललंय? मी त्यांना म्हटलं सर्व काही चांगलं चाललंय, एकंदरीत बरं चाललंय. त्यावर ते मला म्हणाले, तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जायचं आहे. त्यांनी मला इतकंच सांगितलं आणि म्हणाले, ही गोष्ट कोणाला सांगू नका, मी लवकरच तुमच्याशी संपर्क साधेन. त्यानंतर काही वेळाने माझी राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती होणार असल्याचं वृत्त समजलं.

हरिभाऊ बागडे (संग्रहित छायाचित्र)

हे ही वाचा >> Maharashtra Governor : महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल, राष्ट्रपतींकडून घोषणा; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यावर राजस्थानची जबाबदारी

जिथे जायला कोणी तयार व्हायचं नाही तिथे जाऊन मी काम करायचो : हरिभाऊ बागडे

हरिभाऊ बागडे म्हणाले, वयाच्या १२ व्या वर्षापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत आहे. मी चौथी इयत्तेत होतो, तेव्हापासून संघासाठी काम करत आहे. त्यानंतर १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्या वर्षीच्या निवडणुकीत भाजपाची बरीच पडझड झाली. त्यानंतर मला वाटलं की आपण आता भाजपासाठी काम करावं. संघाबरोबरच भाजपासाठी देखील काम करण्याची इच्छा होती, त्यानुसार मी काम करू लागलो. त्या काळात जिथे कोणी जात नव्हतं जिथे जाऊन मी काम करायचो. जिथे काम करायला कोणीही तयार नसायचं तिथे जाऊन मी काम करत होतो. हाच माझा पूर्वीपासूनचा स्वभाव असल्यामुळे मी इथवर आलो आहे. पक्षाने मला जी जी कामं सांगितली, ज्या जबाबदाऱ्या दिल्या, त्या सर्व मी पार पाडल्या. त्याचंच फळ म्हणून आता माझी राज्यपालपदी नियुक्ती नियुक्ती केली असावी, असं मला वाटतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haribhau bagade reaction after rajasthan governor narendra modi call asc
Show comments