Discover the top tourist places to visit in Harihareshwar : मुंबई-पुण्यापासून थोडंसं लांब, कोकणाचा आस्वाद घ्यायचाय. पण तळ कोकणात जाण्याइतपत वेळ तुमच्याकडे नाहीय. मग तुमच्याकडे सर्वांत बेस्ट पर्याय आहे हरिहरेश्वरचा. अत्यंत रेखीव मंदिर अन् सुंदर बीचमुळे येथे पर्यटकांचा ओढा वाढलाय. अवघ्या दोन दिवसांतही तुम्ही इथं मनसोक्त आनंद लुटू शकता. तुम्हालाही इथं जायचंय का? चला तर मग इथं कसं जाल? काय पाहाल? आणि काय खायचं हे आज जाणून घेऊयात.

हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात वसलेलं एक अत्यंत सुंदर, निसर्गरम्य आणि धार्मिक पर्यटन स्थळ आहे. अरबी समुद्र आणि सावित्री नदीच्या संगमावर वसलेल्या या गावाला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखलं जातं.

हरिहरेश्वरला गेल्यावर काय काय पाहाल?

हरिहरेश्वर मंदिर व काळभैरव मंदिर: हे येथील मुख्य धार्मिक आकर्षण आहे. मंदिरात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती यांचे एकत्र लिंग रूप पाहायला मिळते. येथील परंपरेनुसार, प्रथम काळभैरवाचे आणि नंतर हरिहरेश्वराचे दर्शन घेतले जाते. मंदिर सकाळी ६:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत उघडे असते.

हरिहरेश्वर प्रदक्षिणा मार्ग (डोंगर प्रदक्षिणा): मंदिराच्या मागून डोंगरावरून जाणारा हा प्रदक्षिणा मार्ग अरबी समुद्राचे आणि खडकाळ किनाऱ्याचे विहंगम दृश्य दाखवतो. समुद्राच्या भरती-ओहोटीची वेळ पाहूनच ही प्रदक्षिणा करावी.

हरिहरेश्वर बीच: हा अतिशय शांत, स्वच्छ आणि काळ्या-पांढऱ्या वाळूचा समुद्रकिनारा आहे. हा किनारा विश्रांतीसाठी उत्तम असला तरी पाण्याखालील धोकादायक प्रवाहामांमुळे येथे पोहणे सुरक्षित मानले जात नाही.

बागमंडला: हरिहरेश्वरपासून साधारण ३ किमी अंतरावर असलेले हे शांत गाव असून, येथून बाणकोट किल्ल्यासाठी फेरी बोट (Ferry) सेवा मिळते.

सुवर्ण गणेश मंदिर – हरिहरेश्वरपासून ३० ते ३५ किमी अंतरावर असलेल्या दिवेआगारत सुवर्ण गणेश मंदिर आहे. मंदिरात संगमरवरी गणेशमूर्ती असून त्यावर हा सोन्याचा मुखवटा चढवलेला आहे. हे मंदिर पारंपरिक कोकणी शैलीत बांधलेले असून आजूबाजूला नारळी-सुपारीच्या बागा (वाड्या) आहेत, ज्यामुळे येथील वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न वाटते.

दिवेआगर समुद्रकिनारा: सुवर्ण गणेश मंदिरापासून हा पांढऱ्या वाळूचा अथांग किनारा अवघ्या काही अंतरावर आहे. हा किनारा अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित मानला जातो. येथे अनेक वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत.

रुपनारायण मंदिर: दिवेआगरमधीलच हे एक प्राचीन विष्णू मंदिर असून येथील कोरीव मूर्ती पाहण्यासारखी आहे.

हरिहरेश्वरला कसं पोहोचायचं?

रस्त्याने: मुंबईपासून हे अंतर साधारण २०० किमी आणि पुण्यापासून साधारण १६० किमी आहे. दोन्ही शहरांमधून थेट एसटी (ST) बसेस आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत.मुंबईहून हरिहरेश्वरला जायला साधारण ५ ते ६ तास लागतात तर, पुण्यापासून अवघ्या ४ ते ५ तासांत पोहोचता येतं.

रेल्वेने: सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव आहे. तेथून खाजगी वाहनाने किंवा बसने हरिहरेश्वरला जाता येते.

राहण्याची आणि खाण्याची सोय

निवास : येथे राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) रिसॉर्ट उत्तम पर्याय आहे. याशिवाय अनेक खाजगी हॉटेल्स, कॉटेजेस आणि घरगुती होमस्टे उपलब्ध आहेत.

खाद्यसंस्कृती: कोकणी पद्धतीचे अस्सल शाकाहारी जेवण (विशेषतः उकडीचे मोदक आणि सोलकढी) आणि खवय्यांसाठी ताज्या सी-फूड थाळीचे उत्तम पर्याय इथे मिळतात.