Harishchandragad Trek full travel route guide : पावसाळा सुरू झाल्याने ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. प्रत्येक विकेंडला गडांवरील गर्दी वाढताना दिसत आहे. चढाईला सोपे असलेल्या ट्रेकपासून कठीण ट्रेकिंग करावं लागणाऱ्या ठिकाणीही गर्दी वाढतेय. त्यामुळे गडप्रेमींचं आवडतं ठिकाण असलेल्या हरिश्चंद्र गडावर कसं पोहोचायचं, तिथे जाऊन काय काय पाहायचं, तिथे गेल्यावर काय काळजी घ्यायची, याविषयी सविस्तर माहिती घेऊयात.
मुंबईहून हरिश्चंद्रगडावर कसं जायचं?
खाजगी वाहनाने जाणार असाल तर कल्याणमार्गे कसारा, घोटी, राजूर करत पाचनई गावात पोहोचा. मुंबईवरून हे अंतर साधारण १८० ते २०० किमी आहे आणि गाडीने जाण्यास ६ तास लागतात. जर सार्वजनिक वाहतुकीने जात असाल तर मुंबईहून लोकल ट्रेनने कसारा स्टेशन गाठा. गाठा. कसारा स्टेशनवरून थेट पाचनई गावासाठी शेअरिंग जीप किंवा खाजगी टॅक्सी भाड्याने मिळतात.
हरिश्चंद्र गडावर पोहोचण्याचा दुसरा मार्ग खिरेश्वर मार्ग आहे. हा मध्यम ते कठीण स्वरुपाचा मार्ग असून ४ ते ५ तास चढाईसाठी लागतात. खिरेश्वर मार्गावर पोहोचण्यासाठी मुंबईतून कल्याण, माळशेज घाट, खुबी फाटा, खिरेश्वर गावामार्गे जावं लागतं. कल्याण एसटी डेपोतून माळशेज घाटाकडे जाणाऱ्या बसने खुबी फाटा येथे उतरावं. तिथून पुढे खिरेश्वर गावापर्यंत पायी जावं लागतं. हा मार्ग जंगलातून आणि चढ-उताराचा आहे.
अशी करा हरिश्चंद्र गडाची ट्रेकिंग
जर तुम्ही शनिवार-रविवार असा ट्रेक प्लॅन करत असाल, तर रात्री प्रवास करून सकाळी चढाई करणे सोयीचे पडते.रात्री प्रवास करून पहाटे साडेवाजेपर्यंत पाचनई बेस व्हिलेजला पोहोचा. साडेपाचपर्यंत फ्रेश होऊन गरमागरम चहा आणि नाश्ता करून घ्या. सकाळी सहा वाजता ट्रेकिंगला सुरुवात करा. पाचनई मार्गावर वन विभागाने लोखंडी रेलिंग आणि पायऱ्या बसवल्या आहेत. सकाळी ८ वाजेपर्यंत गडाच्या मुख्य पठारावर तुम्ही पोहोचाल.
हरिश्चंद्र गडावर पाहण्यासारखं काय?
साडेआठ ते अकराच्या दरम्यान गडभ्रमंती करा. सहाव्या शतकात बांधलेलं कोरीव पाषाणी मंदिर असेललं हरिश्चंद्रेश्वर मंदिर केदारेश्वर गुहा आणि सप्ततीर्थ पुष्करणी तुम्ही येथे पाहू शकता.
सकाळी सव्वाअकरा वाजता गडाचं मुख्य आकर्षण असलेल्या भव्य कोकणकडाकडे प्रस्थान करा. साधारण अर्धा तास चालल्यानंतर तुम्ही कोकणकडा येथे पोहोचाल. दुपारी साडेबारा वाजता गडावर स्थानिक गावकऱ्यांनी चालवलेल्या टेंट किंवा शेडमध्ये पिठलं भाकरी किंवा गरमागरम शाकाहारी जेवणाचा आस्वाद घ्या. दुपारी दीडच्या सुमारास खाली उतरायला सुरुवात करा. दुपारी साडेतीनच्या सुमारास बेस व्हिलेजला पोहोचून पुन्हा परतीचा प्रवास करता येईल.
हरिश्चंद्र गडावर काय काळजी घ्यायची?
स्थानिक गाईड (वाटाड्या): हरिश्चंद्रगडावर अचानक दाट धुकं पडतं आणि रस्ता चुकण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे स्थानिक गाईड सोबत घेणं अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य आहे.
कोकणकड्यावर काळजी: कोकणकड्याची दरी अतिशय खोल आणि सरळ रेषेत आहे. तिथे जोरदार वारे वाहतात. फोटो किंवा सेल्फी काढताना कड्याच्या अगदी जवळ जाऊ नका.
मोबाईल नेटवर्क: पाचनई किंवा खिरेश्वर गावात मोबाईलला नेटवर्क नसतं. गडावर काही ठराविक ठिकाणीच रेंज मिळते. त्यामुळे घरी आधीच कल्पना देऊन ठेवा.
केदारेश्वर गुहा: पावसाळ्यात या गुहेत कंबरेइतकं बर्फासारखं थंड पाणी असतं. गुहेत उतरताना सावधगिरी बाळगा आणि पाण्याचा अंदाज घेऊनच पुढे जा.
पावसाळ्यात विशेष काळजी: पावसाळ्यात पाषाण आणि मातीचे रस्ते अत्यंत निसरडे होतात. नळीची वाट किंवा साधले घाट हे कठीण मार्ग पावसाळ्यात पूर्णपणे टाळावेत.
कॅपिंग आणि मुक्काम: गडावर रात्री खूप थंडी आणि वेगात वारे असतात. स्वतःचे टेंट नेण्यापेक्षा गडावर स्थानिक लोकांकडून टेंट भाड्याने घेणं सोयीचं पडतं.
आवश्यक वस्तू: ट्रेकिंगसाठी चांगल्या ग्रीपचे शूज, रेनकोट/विंडचीटर, ओआरएस (ORS) किंवा ग्लुकोज, ओले कपडे ठेवण्यासाठी प्लास्टिक बॅग, टॉर्च (रात्रीच्या ट्रेकसाठी) आणि किमान २ ते ३ लीटर पाणी सोबत ठेवा.
पर्यावरणाची काळजी: गडावर प्लास्टिक कचरा किंवा दारूच्या बाटल्या फेकून गडाचे पावित्र्य भंग करू नका. आपला कचरा स्वतः सोबत परत खाली घेऊन या.
