कराड : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी लोकशाहीच्या रक्षण व सक्षमीकरणासाठी मतदान प्रक्रिया मतपत्रिकांवरच (बॅलेट पेपर) घेण्याची आणि शिक्षण-रोजगाराचे विकेंद्रीकरण करण्याची आग्रही भूमिका मांडली. सध्याचा तरुण पिढीतील असंतोष, कालबाह्य शिक्षणपद्धती आणि वाढत्या बेरोजगारीवर त्यांनी चिंता व्यक्त करताना, राज्यकर्ते व प्रशासनकर्त्यांच्या धोरणांवर कोरडे ओढले.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयानंतर माजी उपपंतप्रधान (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या यांच्या कराड येथील समाधीस्थळी अभिवाद केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. राज्याचे माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, प्रभाकर देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत तरुणांमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोष असून, तो विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून बाहेर पडत आहे. मतमोजणीदरम्यान, मतपेट्यांमध्ये ‘नोकऱ्या नसतील तर पदवी कशासाठी?’ अशा आशयाच्या तरुणांच्या चिठ्ठ्या आढळल्याची गंभीर बाब त्यांनी समोर आणली. त्यामुळे केवळ पदवी न देता व्यवहाराभिमुख व कौशल्याधारित, रोजगाराभिमुख शिक्षणव्यवस्था उभारावी लागेल अशी भूमिका त्यांनी मांडली.
शिक्षणव्यवस्थेत अमुलाग्र बदलाची गरज
आजचे अनेक अभ्यासक्रम हे आधुनिक काळाशी विसंगत ठरत असून, पदवी आणि प्रत्यक्ष कौशल्य यांत मोठी दरी निर्माण झाली आहे. शिक्षणात व्यवहारज्ञान, जीवनोपयोगी कौशल्ये आणि रोजगाराभिमुखता यांचा समावेश आवश्यक बनला आहे. प्राथमिक ते उच्चशिक्षणाची गुणवत्ता सुधारून नोकरी- व्यवसायाच्या थेट संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे आमदार देशमुख- जाधव म्हणाल्या.
आर्थिक व रोजगाराचे विकेंद्रीकरण
मुंबई- पुण्यासारख्या महानगरांवर पडणारा ताण कमी करून, प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यानुसार उद्योग उभारणे, त्या- त्या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर तरुणांना नोकरी व व्यवसायाच्या संधी देणे यासह रोजगारासोबत आर्थिक विकासाचे विकेंद्रीकरण झाल्यास प्रादेशिक असमतोल निश्चित दूर होईल, असे आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांनी ठामपणे सांगितले.
