Harshvardhan Patil Ichalkaranji Rally :भारती जनता पार्टीचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे. सांगली येथील एका कार्यक्रमात पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने यांनी सलग दुसऱ्यांदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. या विजयाबाबत माने यांचं अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, "इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ हा तसा पाहिला तर पाकव्याप्त काश्मीर मानायला पाहिजे." पाटील यांच्या या वक्तव्यावर आता विरोधकांच्या तिखट प्रतिक्रिया येऊ शकतात. १९७५ ते २००९ पर्यंत हातकणंगले हा मतदारसंघ इचलकरंजी नावाने ओळखला जात होता. मात्र २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर या मतदारसंघाचं नाव हातकणंगले असं करण्यात आलं. या हातकणंगले मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील यांचा अवघ्या १३ हजार मतांनी पराभव केला. काय म्हणाले हर्षवर्धन पाटील? सांगलीच्या सभेत हर्षवर्धन पाटील म्हणाले, "मी सर्वात आधी खासदार धैर्यशील माने यांचं अभिनंदन करतो. सर्वांना विनंती करतो की तुम्ही देखील टाळ्या वाजवून माने यांचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ हा तसा पाहिला तर पाकव्याप्त काश्मीर मानायला पाहिजे. कारण आजूबाजूला सगळी मोठी वादळं होती. आजूबाजूला सगळ्या शक्ती विरोधात उभ्या ठाकल्या होत्या. काही शक्ती अदृश्य होत्या, तर काही दृश्य स्वरूपाच्या होत्या. या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी येथे विजय मिळवला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत धैर्यशील माने यांनी या वावटाळात (वादळात) दिवा लावला आहे. त्यामुळे मी धैर्यशील माने यांचं मनापासून अभिनंदन करतो." पाटील म्हणाले, "बरं झालं माने यांनी मला सांगितलं आणि मी विमानाने नाही तर कारने येथे आलो. त्यांनी मला सांगितलं, पुढच्या वेळी इचलकरंजीला येताना ट्रेनने या. त्यानंतर तुम्ही मोटरसायकलवरून या. गरज पडल्यास सायकलवरून या. काल राज्याचे मुख्यमंत्री देखील पंढरपूरला बुलेटवर बसून गेले. राज्याचा नेता असा असायला हवा. राज्याचा नेत जनसामान्यांमध्ये मिसळायला हवा. हीच शिकवण आपल्याला या मातीने दिली आहे. मी किंवा धैर्यशील माने देखील ती शिकवण पाळत आलो आहोत." हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे ही वाचा >> "भुजबळांनी परतीचे प्रयत्न केले…", अनिल देशमुखांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, "त्यांची दुटप्पी भूमिका…" अन् मी वादळात दिवा लावला : धैर्यशील माने काही दिवसांपूर्वी धैर्यशील माने यांनी देखील म्हटलं होतं की हातकणंगले मतदारसंघात मी वादळात दिवा लावला आहे. माने म्हणाले होते, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण ही लोकसभा निवडणूक लढलो. संपूर्ण ताकदीनिशी आपण या निवडणुकीत यशस्वी झालो. पश्चिम महाराष्ट्रात अनेक बुरुज ढासळले (मातब्बर नेते पराभूत झाले) आणि मी वादळात दिवा लावला. मतमोजणीच्या दिवशी माझ्या मतदारसंघात दुपारपासूनच विरोधक गुलाल लावून फिरू लागले होते. मशाल पेटली, मशाल पेटली (शिवसेनेच्या ठाकरे गटाचं निवडणूक चिन्ह) असं म्हणत जल्लोष करत होते. परंतु, संध्याकाळी पाच वाजता पाऊस पडला आणि ती मशाल विझल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं."