शिवसेना (ठाकरे) पक्षातून फुटून काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी आज (२५ जून) पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याच्या प्रकरणावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. ‘ही लोकप्रतिनिधीची नव्हे तर गुंडाची भाषा आहे. महाराष्ट्र अशा दादागिरीला कधीही स्वीकारणार नाही’, अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर टीका केली.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
“प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमकावणं, शिवीगाळ करणं आणि ‘मारून टाकेन’ अशी मुजोरीची भाषा वापरणं ही लोकप्रतिनिधीची नव्हे तर गुंडाची भाषा आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार हे जनतेचे डोळे आणि कान असतात. त्यांच्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीच्या गळ्यावर हात घालण्याचा प्रकार आहे. सत्ता आणि वाय प्लस (Y+) सुरक्षेच्या जोरावर माध्यमांना धमकावणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांची मुजोर, हुकूमशाही आणि गुंडशाही वृत्ती अत्यंत निंदनीय आहे. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धमक्या देणं हे लोकशाहीत कदापि खपवून घेतलं जाणार नाही. या संपूर्ण प्रकाराचा महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने तीव्र शब्दांत निषेध करतो. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशा दादागिरीला आणि गुंडशाहीला कधीही स्वीकारणार नाही”, असं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली?
खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याच्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मी प्रवासात असल्यामुळे मला या प्रकरणाची काही माहिती नाही. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊनच त्यावर बोलणं योग्य होईल. नेमकं काय घडलं? याची माहिती मी घेतो. मात्र, कोणालाही कोणीही अशा प्रकारची धमकी देणं योग्य नाही.”
एकनाथ शिंदेंकडून संजय दिना पाटलांना दिलगिरी व्यक्त करण्याचा सल्ला
“मी आताच खासदार संजय दिना पाटील यांच्याशी बोललो. त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्या की, पत्रकारांबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी कोणतीही भावना नव्हती. माझे आणि पत्रकारांचे संबंध चांगले आहेत. पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, असं संजय दिना पाटील यांनी मला सांगितलं. पत्रकारांच्या बाबतीत संजय दिना पाटील यांच्या मनामध्ये कुठलाही राग नव्हता. पत्रकारांच्या बाबतीत अशा प्रकारचं वक्तव्य कोणत्याही लोकप्रतिनिधीने करू नये. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडून जर पत्रकारांना काही शब्द गेले असतील तर पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करावी”, असं स्पष्टीकरण देत एकनाथ शिंदे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
संजय दिना पाटलांनी काय वक्तव्य केलं होतं?
संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना बोलताना म्हटलं होतं की, “रेकॉर्ड करा आणि सांगा तिकडे, कमिशनरकडे जाऊन तक्रार करा. तुमची इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं. मग अजून कशाला गां## घुसताय. अरे कोणत्याही गोष्टीची लिमिट असते. सांगितलं ना सर्व. त्याने काही बोलूदे. तुझ्या आ## ### गेलं, आणि आता माझ्याकडे येऊ नका. माझ्याकडे काही घ्यायला आला तर मारणार. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आलात तर मार खाणार”, अशा भाषेत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
