मुंबई : दिल्लीतील रामलीला मैदानावरील ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या ‘इंडिया आघाडी’च्या पदयात्रेने मोदी सरकार हादरले आहे. मोदी-शहा यांना झोपेतही राहुल गांधी दिसत आहेत. आघाडीच्या पदयात्रेचा धसका घेतल्याने भाजप ‘लोकशाही बचाओ, संविधान बचाओ’ यात्रा करत आहे. संविधानाचे खरे मारेकरी भाजप व संघ परिवार आहेत. भाजपच्या तोंडात संविधान आणि मनात मात्र मनुस्मृती आहे. भाजपची ‘ संविधान बचाओ’ यात्रा ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी भाजपवर टीका केली आहे.

इंडिया आघाडीच्या रविवारच्या रामलीला येथील यात्रेच्या विरोधात भाजपने आज देशभर यात्रा काढून प्रत्युत्तर दिले. त्यासंदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले की, २०२४ च्या निवडणुकीत मतचोरी करून मोदी व फडणवीस यांची सरकारे सत्तेत आली. ही मतचोरी पकडली असून त्यांची लवकरच सत्ता तर जाणार आहे. सत्ता गेल्यानंतर कारवाई होणार या भीतीने त्यांची झोप उडाली आहे. विरोधक घुसखोर असल्याची भाजपवाले भाषा करतात, पण किती घुसखोर पकडले हे मात्र ते सांगत नाहीत. घुसखोरांच्या नावाखाली भाजपने नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्व संविधानिक संस्थांवर ताबा मिळवून लोकशाही संपवली जात आहे. या संस्थांमध्ये संघ आणि भाजपशी संबंधित व्यक्ती घुसवल्या आहेत. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला नोटीसही पाठवू शकत नाही. न्यायपालिकेतही सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. भारतीय जनता पक्षाने संविधान बदलण्यासाठीच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चारशे पारचा नारा दिला होता. सत्तेत आल्यावर संविधान बदलू, असे भाजपच्या नेत्यांनी जाहीर सभांमधून आश्वासन दिले होते, याची आठवण सपकाळ यांनी करून दिली.

राहुल गांधी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान दाखवत आहेत. राहुल यांच्या हातातील लाल रंगाचा पुठ्ठा असलेले भारतीय संविधान भाजपला खटकते आहे. कारण भाजपने लाल रंगाचा धसका घेतला आहे. भाजपची आगपाखड त्यांची चोरी पकडली गेल्याने होत आहे. कोण राहुल? येथून सुरू झालेला भाजप नेत्यांचा प्रवास आता मोदी-शहा यांना झोपेतही राहुल गांधी दिसण्यापर्यंत आला आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.