Harshvardhan Sapkal Sunetra Pawar: बीड येथील पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ म्हणत टीका केली आहे. पत्रकार परिषेदत कायदा सुव्यवस्थेवर विचारलेल्या प्रश्नावर धनंजय मुंडे पत्रकारास रोखत असल्याचे दिसत आहे. यावरुनच काँग्रेसने टीका केली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी काँग्रेसच्या टीकेचे समर्थन करत सुनेत्रा पवारांनी त्या दुर्गा आहेत हे सिद्ध करावं असं आव्हान दिलं आहे. दुर्गा आहे हे सिद्ध करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी अर्थखातं स्वत:कडे घेण्यासह विविध कामांची यादीच हर्षवर्धन सपकाळांनी सांगितली आहे.
त्यांनी त्या दुर्गा आहेत असं सिद्ध करावं – हर्षवर्धन सपकाळ
मुंबईत गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळांनी राष्ट्रवादीने या टीकेकडे सकारात्मकपणे पाहण्याची गरज व्यक्त केली. “याबाबत गोंधळ घालण्याची अथवा शहाणपण शिकवण्याची गरज नाही. इंदिरा गांंधींना देखील गुंगी गुडिया म्हणून हिणवण्यात आले पण त्यांनी त्यांच्या कतृत्वातून त्या गुंगी गुडिया नसल्याचे सिद्ध केलं आणि वाजपेयींना देखील त्यांचे दुर्गा म्हणून कौतुक करावं लागलं. सुनेत्रा पवारांवर आम्ही गुंगी गुडिया म्हणून टीका केलीय तर, त्यांनी त्या दुर्गा आहेत असं सिद्ध करावं”, असे आव्हानच सपकाळांनी दिले.
दुर्गा सिद्ध करण्यासाठी सांगितली पाच कामं
“सुनेत्रा पवारांनी दुर्गा आहे हे सिद्ध करण्यासाठी ताबडतोब अर्थखातं स्वत:कडे घ्यावं. अजित पवारांच्या अपघाताचा तपास लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका घ्यावी. अजित पवारांनी लाडक्या बहिणीचे अनुदान वाढवणार असल्याचे सांगितलं होतं ते त्यांनी करावं, कर्जमाफीचा निर्णय घ्यावा आणि स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा, असं त्यांनी केलं तर आमचे आरोप चुकीचे ठरतील आणि महाराष्ट्र त्यांना दुर्गा म्हटल्याशिवाय राहणार नाही”, असे सपकाळ म्हणाले.
काँग्रेसच्या टीकेचे समर्थन
“राष्ट्रवादी मोदी – शाहांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे का? अशी संशयाची सुई निर्माण झालीय”, अशी टीका देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. सपकाळ यांनी यावेळी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला लिहलेल्या पत्राचा दाखल देखील दिला. राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आयोगाने पत्र लिहून त्यांनी घेतलेले निर्णय पक्षाच्या घटनेला अनुरुप नाहीत, असे सांगितले आहे. सुनेत्रा पवार आयोगाच्या पत्रावर देखील काही बोलत नसतील तर काँग्रेसने त्यांच्यावर केलेला आरोप योग्य आहे, अशी भूमिका सपकाळांनी स्पष्ट केली.
