काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ म्हणत टीका केल्याने वाद उफाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून याप्रकरणी निषेध केला जात असताना आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘गुंगी गुडिया’ शब्दप्रयोग का केला याचे स्पष्टीकरण दिले आहे. सपकाळांनी यावेळी काँग्रेसने केलेल्या टीकेचे समर्थन केले. सुनेत्रा पवारांनी कतृत्वातून आरोप खोडून काढवेत त्यानंतर महाराष्ट्र त्यांना दुर्गा म्हणून ओळखेल, असे सपकाळ म्हणाले. मुंबईत गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. दरम्यान, याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करत दिलगिरीची मागणी केली.
गुंगी गुडिया शब्दप्रयोग का केला? सपकाळांनी स्पष्टच सांगितले
“पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजेत, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजेत. राजकारणात, समाजकारणात आरोप होत असतील तर त्याची उत्तरे दिली पाहिजेत. काँग्रेसने पोस्ट केलेल्या व्हिडीओत एक गुंडगिरी प्रवृत्तीचा लोकप्रतिनिधी पत्रकारांना गप्प करताना दिसत आहे. पण, उपमुख्यमंत्री एक शब्दही बोलत नाहीयेत. यात मूळ मुद्दा त्यांच्या वर्तनाचा आहे. उपमुख्यपदावरील व्यक्ती पत्रकारांचे प्रश्न घेत नाही, आणि अपकिर्ती असणारा एक लोकप्रतिनिधी त्यांच्याकरवी पत्रकारांना गप्प करत आहे, हे लोकशाहीला अशोभनीय आहे. अशावेळी हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी निभावल्याने गुंगी गुडिया शब्दप्रयोग केला आहे”, असे स्पष्टीकरण सपकाळांनी दिले.
“काँग्रेसने केलेले वर्णन अगदी योग्य” – हर्षवर्धन सपकाळ
“गुंगी गुडिया हा शब्द शिवी, अपशब्द किंवा असंसदीय शब्द नाही ते एक वर्णन आहे. हा शब्दप्रयोग उपमुख्यमंत्र्यांना व्यवस्थिपणे बसला आहे. अनेक प्रकारात हे दिसून आलं आहे. अजित पवारांच्या अपघातावर त्या बोलत नाहीत, या अपघाताप्रकरणी अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही यावर बोलत नाहीत. अर्थखातं अद्याप त्यांना का मिळालं नाही यावर त्या बोलत नाहीत. भाजपा त्यांच्या पक्षाच्या अधिकारांवर गदा आणत आहे, त्यावर त्या काही बोलत नाहीत. त्यांनी बोलणं थांबवलं आहे. उपमुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीसाठी हे अशोभनीय आहे. अजित पवारांसारख्या बाणेदार नेत्याच्या पक्षाचं नेतृत्व करणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं काँग्रेसने केलेले वर्णन अगदी योग्य आहे”, असे सपकाळ पुढे म्हणाले.
“त्यांनी दुर्गा आहे असं सिद्ध करावं” – सपकाळांचे आव्हान
राष्ट्रावादीने या टीकेकडे सकारात्मकपणे पाहण्याची गरज सपकाळांनी व्यक्त केली. “याबाबत गोंधळ घालण्याची अथवा शहाणपण शिकवण्याची गरज नाही. इंदिरा गांंधींना देखील गुंगी गुडिया म्हणून हिणवण्यात आले पण त्यांनी त्यांच्या कतृत्वातून त्या गुंगी गुडिया नसल्याचे सिद्ध केलं आणि वाजपेयींना देखील त्यांचे दुर्गा म्हणून कौतुक करावं लागलं. सुनेत्रा पवारांवर आम्ही गुंगी गुडिया म्हणून टीका केली असेल तर, त्यांनी दुर्गा आहे असं सिद्ध करावं”, असे आव्हानचं सपकाळांनी दिले.
“ताबडतोब अर्थखातं स्वत:कडे घ्या” – सपकाळ
“सुनेत्रा पवारांनी दुर्गा आहे हे सिद्ध करण्यासाठी ताबडतोब अर्थखातं स्वत:कडे घ्यावं, अपघाताचा तपास लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका घ्यावी. अजित पवारांनी लाडक्या बहिणीचे अनुदान वाढवणार असल्याचे सांगितलं होतं ते त्यांनी करावं, कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा, असं त्यांनी केलं तर आमचे आरोप चुकीचे ठरतील आणि महाराष्ट्र त्यांना दुर्गा म्हटल्याशिवाय राहणार नाही”, असे सपकाळ म्हणाले. तसेच, “राष्ट्रवादी मोदी – शाहांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे का? अशी संशयाची सुई निर्माण झालीय”, असेही सपकाळ पुढे म्हणाले.
सपकाळ यांनी यावेळी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने पत्र लिहून घेतलेले निर्णय पक्षाच्या घटनेला अनुरुप नाहीत, असे सांगितले आहे. सुनेत्रा पवार आयोगाच्या पत्रावर देखील काही बोलत नसतील तर काँग्रेसने त्यांच्यावर केलेला आरोप योग्य आहेत, अशी भूमिका सपकाळांनी स्पष्ट केली.
