हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान बाबत एक वक्तव्य केलं होतं ज्यावरुन वाद निर्माण झाला होता. या वादावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी आता थेट वीर सावरकरांच्या सहा सोनेरी पानं या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृत म्हणणारे सावरकर भाजपाला कसे काय चालतात? असा प्रश्न सपकाळ यांनी विचारला आहे. इतकंच नाही तर मी काहीही चुकीचं बोललो नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
दोन वेगळ्या कालखंडातील महापुरुषांबाबत मी बोललो-सपकाळ
छत्रपती शिवाजी महाराज अद्वितीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. मी कुठल्याही प्रकारे चुकीचं बोललो नाही. दोन वेगळ्या कालखंडातले दोन वेगळे महापुरुष होऊन गेले त्यावर मी बोललो आहे. मला जो प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सर्व महापुरुषांचे फोटो लावले जावेत यात शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानचा उल्लेख आहे याकडे तुम्ही कसं बघता हे विचारण्यात आलं त्यावर मी उत्तर दिलं होतं. मी हे म्हटलं की शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार केला पाहिजे. त्यांच्या शौर्याचा आदर्श घेऊन टिपू सुलतानने इंग्रजांशी लढा दिला असं मी म्हटलं होतं. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही. मी जे उत्तर दिलं त्या उत्तराचा ध चा मा केला जातो आहे. जे वक्तव्य करणारे आहेत त्यांना वाद निर्माण करायचा आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करुन भाजपाला दंगली घडवायच्या आहेत असाही आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
सावरकरांच्या सहा सोनेरी पानं पुस्तकाचा उल्लेख करत काय म्हणाले सपकाळ?
सावरकरांनी ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल खूप चुकीचं लिहिलं आहे. शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृती म्हणण्याचे धाडस सावरकर यांनी केले आहे. ‘स्वराज्य हे स्थापन होणारच होतं. पण कावळा बसायला आणि डांग तुटायला एक वेळ येते, त्याप्रकारे शिवाजी महाराज आले’, असं सावरकरांनी त्या पुस्तकात लिहले आहे. असं लिहणारे सावरकर भाजपाला कसे चालतात? गोंधळ निर्माण करणं हे भाजपाचे धोरण आहे असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी हा सवाल भाजपाला केला आहे.
वीर सावरकर यांचं पुस्तक का जाळलं नाही?
भाजपाने जे काही आंदोलन केलं त्यात माझी प्रतिमा जाळली त्याऐवजी वीर सावरकर यांचं सहा सोनेरी पानं हे पुस्तक जाळायला पाहिजे होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मावळा आहे. मी या गोष्टींना घाबरणार नाही. शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे आणि संविधान हा आमचा आदर्श आहे असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे.

