Harshvardhan Sapkal on Baramati Assembly By-election: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेस पक्षाने आपला उमेदवाराचा अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. रोहित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी याबाबतची विनंती केल्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र हे करत असताना २०२९ मध्ये बारामती विधानसभेत काँग्रेसचा आमदार असेल, असेही ते म्हणाले.

काँग्रेसने माघार का घेतली?

अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपाचा मित्र पक्ष असल्यामुळेच आम्ही बारामतीची पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोटनिवडणुकीला उमेदवार देऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विनंती केली होती. तसेच अजित पवार यांनी राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर निवडणूक लढवली होती. याची आठवणही राष्ट्रवादीकडून करून देण्यात आली. अजित पवार यांचे ज्याप्रकारे अपघाती निधन झाले, ते सर्व महाराष्ट्राला चटका लावणारे आहे. या सर्वांचा सांगोपांग विचार करून आम्ही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पार्थ पवारांच्या विधानाचा उल्लेख

रोहित पवार यांनीही भेट घेऊन निवडणूक बिनविरोध होण्याबद्दल विनंती केल्याचा उल्लेख हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. यावेळी पार्थ पवार यांचे नाव न घेता त्यांनी केलेल्या विधानावर सपकाळ यांनी उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, “मधल्या काळात काही उथळ, अपरिपक्व आणि हास्यास्पद विधाने करण्यात आली होती. या विधानाबाबत रोहित पवार यांनी परिवाराकडून दिलगिरी व्यक्त केली.”

शरद पवार यांनीही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी संवाद साधला असून काँग्रेसचा अर्ज मागे घेण्यासंदर्भात चर्चा केल्याचेही सपकाळ यांनी सांगितले.

बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार असणार

बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेसच्या लढायलाच पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका आहे. वैचारिक पातळीवर आमची भूमिका योग्यच आहे. मात्र सामंजस्य आणि राज्याच्या संस्कृतीची किनार पाहता, आम्ही आमच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. अर्ज मागे घेताना कोणत्याही अटी शर्ती आम्ही घातलेल्या नाहीत, हेही तितकेच खरे असल्याचे सपकाळ म्हणाले.

आज आम्ही दोन पावले मागे घेत असलो तरी २०२९ साली बारामतीमध्ये काँग्रेस पक्षाचा आमदार असेल, ही ग्वाही आम्ही देतो अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

अजित पवार गटाचा निषेध

अजित पवार यांनी भाजपाच्या विखारी नेतृत्वाबरोबर जायलाच नको होते, ही आमची सुरुवातीची भूमिका होती. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना निवडणुकीला जाऊ दिले नाही. सातत्याने भाजपाकडून वेगळी वागणूक दिली जात असूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाबरोबर सत्तेत राहिल्याबद्दल आम्ही अजित पवार गटाचा निषेध केला आहे, असेही सपकाळ यावेळी म्हणाले.