Tanisha Bhise Death पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून चर्चेत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप झाला. रुग्णालयाने उपचारांसाठी १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप झाला. आता या प्रकरणात मंगेशकर कुटुंबाने मौन बाळगणं अमानुष असल्याचं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
मंगेशकर कुटुंब हे महाराष्ट्र, भारताचं भूषण आहे. सगळ्याच सरकारांनी त्यांचं योगदान मान्य केलं आहे. मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालय बांधत असताना त्यावेळच्या सरकारने मदत केली. पंडीत नेहरुंनी लता मंगेशकरांना ऐ मेरे वतन के लोगो गाणं म्हटल्यावर सन्मानित केलं होतं ही देखील वस्तुस्थिती आहे. दरम्यान मी तनिषा भिसे कुटुंबियांची भेट घेतली. तनिषा भिसेंना साडेपाच तास ताटकळत ठेवण्यात आला. त्यातून त्यांचा बळी गेला आहे. मातृत्वासाठी आसुसलेल्या महिलेचा अशा पद्धतीने मृत्यू होणं ही बाब हृदयद्रावक आहे.
मंगेशकर कुटुंबाने या प्रकरणी बाळगलेलं मौन अमानुष आहे-सपकाळ
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली ही पहिली घटना नाही. पैशांसाठी अडवलं जातं या तक्रारी कायम येतात, मोठ्या प्रमाणावर अनियमितता आहे. डॉ. घैसास यांची बाजू घेताना डॉ. केळकर म्हणतात राहु केतू डोक्यात आले आणि १० लाख मागितले. इतकं बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केलं. सरकार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची बाजू सरकार घेतं आहे. मंगेशकर कुटुंबाने चांगलं काम केलं म्हणून त्यांना मदत केली आहे. मंगेशकर कुटुंबाने या प्रकरणावर साधलेलं मौन हे कर्कश आहे. ते या संदर्भात माफी मागत नाहीत, भिसे परिवाराचं सांत्वन मंगेशकर कुटुंबापैकी कुणीही गेलेलं नाही. किमान चौकशी करु, अनियमितता दूर करु हे काहीही म्हणत नाही. त्यांचं या प्रकरणावरचं मौन हे अमानुष आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचं प्रसुतीदरम्यान ३१ मार्चला निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने १० लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगितल्याने भिसे कुटुंबियांना दुसऱ्या रुग्णालयात जावं लागलं. या सगळ्या गोष्टी घडतनाच तनिषा भिसे यांची प्रसूती झाली. त्यांनी जुळ्या मुलींना जन्मही दिला. पण प्रसूतीनंतर तनिषा भिसे यांचं उपचारांदरम्यान निधन झालं. या प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर चौफेर टीका झाली. आता मंगेशकर कुटुंबाने मौन बाळगणं अमानुष आहे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.