मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहे. अजित पवार यांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले आहे. पण ‘ब्लॅकबॉक्स’मधील संभाषण अद्याप जाहीर झालेले नाही आणि चौकशीही होत नाही. चौकशीसाठी लागणारा हा विलंब अनाकलनीय आहे, त्यामुळे संशय बळावत चालला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी येथे केली.
अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलेली नाही. शपथविधीला जेवढी घाई केली तेवढी अपघाताच्या चौकशीसाठी करण्यात आली नाही. विमान अपघाताबाबत जनतेच्या मनात शंका असल्याने निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करताना शपथविधीला घाई पण चौकशीला विलंब का, असा सवाल सपकाळ यांनी केला.
अजित पवार यांच्यासारख्या शिस्तप्रिय लोकनेत्याच्या बाबतीत असा अपघात व्हावा हे पटत नाही. जोपर्यंत या अपघाताचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नाही तोपर्यंत असे प्रश्न उपस्थित होतच राहणार. या अपघाताने अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत आणि सरकार हे प्रकरण ज्यापद्धतीने हाताळत आहे त्यावर शंका आणखी वाढत आहेत. अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी एक पत्र तातडीने केंद्रीय मंत्र्याला पाठवले आणि त्याचे उत्तरही आले. त्यानंतर तेथेच हे प्रकरण थांबल्याने पाणी कुठेतरी मुरते आहे, असा संशय सपकाळ व्यक्त केला.
दरम्यान, चीनच्या सीमेवरील कारवायांबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अत्यंत महत्वाचे आणि गंभीर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु मोदी सरकार मात्र त्यांना बोलू देत नाही. भारत सरकार चीन प्रश्नी काहीतरी सत्य लपवत आहे म्हणून विरोधी पक्ष नेत्यालाही संसदेत बोलू दिले जात नाही हे अत्यंत निषेधार्ह आहे. मोदी सरकार संसदेच्या सर्व संकेत, परंपरा आणि नियम पायदळी तुडवत हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी यावेळी केला.

