Harshwardhan Sapkal On Pune BJP Vs Congress Rada: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारे वक्तव्य केल्यानंतर राज्यात राजकारण तापलं आहे. सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते राज्यभरात आंदोलन करत आहेत. या अनुषंगाने आज पुण्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मात्र, यावेळी भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर मोठा राडा झाला.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस भवनाच्या बाहेर आंदोलन करत घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप काँग्रेसने केला असून यामध्ये काही गाड्यांचं मोठं नुकसान झालं. तसेच काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांला दगड लागल्याने तो रक्तबंबाळ झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. ‘पुण्यातील भाजपाचे गुंड काँग्रेस कार्यालयावर चाल करुन आले, भाजपाच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा’, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी काय म्हटलं?
“माझ्या वक्तव्याची मोडतोड करून “ध” चा “मा” करून देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असे मी सांगितले होते, त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला. पुण्यातील भाजपाचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले व त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. भाजपाच्या या गुंडगिरीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पुणे पोलिसांनी दंगलखोर भाजपा गुंडाना चिथावणी देणाऱ्या धीरज घाटे आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपाच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
पुण्यात काय घडलं?
हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत पुण्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केलं. मात्र, यावेळी भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस भवनाच्या बाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा आरोप करण्यात आला. या आंदोलनावेळी दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप काँग्रेसने केला असून यामध्ये काही कारच्या काचा फुटल्या, तसेच गाड्यांचं मोठं नुकसान झालं. तसेच काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांला दगड लागल्याने तो रक्तबंबाळ झाल्याचीही माहिती समोर आली . भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे पुण्यात काही वेळ मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता.
हर्षवर्धन सपकाळ यांनी काय वक्तव्य केलं होतं?
हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या शौर्याप्रमाणेच, त्याच मांदियाळीत टिपू सुलतान आहेत. टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होते. ते भारताचे भूमिपूत्र होते. त्यांनी कधीही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. ते एक शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं.

