Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा देखील सुरू आहेत. या अनुषंगाने पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसून येत आहे. तसेच पार्थ पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
या चर्चांचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील त्याबाबत महत्वाचं भाष्य केलं. ‘राज्यसभेसाठी शरद पवारांची इच्छा आहे का?’, असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
शरद पवार पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी दिले होते. त्याबाबत पत्रकारांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या अनुषंगाने जे वक्तव्य केलं आहे, त्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येईल. मात्र, मुळात असं आहे की शरद पवार यांची पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का? याबाबत संजय राऊतांनी देखील प्रश्न उपस्थित केला होता. शरद पवार यांच्या वयोमानाच्या अनुषंगाने आणि त्यांच्या जेष्ठत्वाच्या अनुषंगाने आणि इंडिया आघाडीचे नेते असल्याच्या अनुषंगाने त्याबाबत नक्कीच चर्चा केली जाईल”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी काय म्हटलं होतं?
“शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा एक घटक आहे. बाकी सगळी हवाबाजी आणि पतंगबाजी आहे. शरद पवार यांची अशी मानसिकता दिसत आहे की आता थांबायला पाहिजे. मात्र,आम्ही त्यांचे चाहते आहोत, आम्ही त्यांना सांगितलं आणि एकदा उद्धव ठाकरे हे देखील आमच्याबरोबर होते, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या सारख्या नेत्याने दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज असण्यासारखं आहे. शरद पवार ज्या दिवशी ठरवतील की त्यांना पुन्हा निवडणूक लढवायची, तेव्हा त्यांना निवडून आणण्याएवढी ताकद महाविकास आघाडीकडे आहे. आमच्याकडे तेवढे मते आहेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
“शरद पवार यांना निवडून आणण्याएवढी मते महाविकास आघाडीकडे नक्कीच आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या सारख्या नेत्याला कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस किंवा आणखी कोणी, विशेषत: दिल्लीमधून अपशकुन आणण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

