अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार रोहित पवार यांनी यात संशय व्यक्त केला आहे. तर, या अपघाताला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते जबाबदार असल्याचा दावाही करण्यात येतोय. अजित पवारांना कोणत्या नेत्यामुळे उशीर झाला, जेणेकरून त्यांना विमानाने बारामती गाठावं लागलं? त्यांनी नेमक्या कोणत्या फाईलवर सही केली होती? यावरही चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता हसन मुश्रीफ यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे.
रोहित पवारांची अस्वस्थता समजू शकतो
हसन मुश्रीफ म्हणाले, “आमदार रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीत २८ जानेवारी रोजी झालेल्या अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सखोल अभ्यास करून प्रेजेंन्टेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. या शंका उपस्थित झाल्या आहेत, ज्याबद्दल अनेक आक्षेप घेतले आहेत त्याची सखोल चौकशी केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांच्या चुलत्यांचा अपघात झाला आहे, त्यांना दुःख झालंय तसंच आम्हालाही झालं आहे. आमच्याही मनातील शंका मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली आहे. पण आमच्या पक्षाती अंतर्गत गोष्टीत भाग घेऊ नये.” तसंच, “अजित पवारांच्या अपघाताबाबत जी माहिती दिली आहे, त्याचा पाठपुरावा ते करत आहेत. पुतण्या म्हणून त्यांची अस्वस्थता समजू शकतो”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
दोघेही व्हिलन कसे होऊ शकतात?
“सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांची दादांबरोबर अनेकवेळ्या भेटी झाल्या आहेत. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे शरद पवारच्या कार्यकाळापासून कार्याध्यक्ष आहेत. आता राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींना केलं जाईल तरीही ते कार्याध्यक्ष राहणारच आहेत. तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत. मतदाना दिवशी मी खुलासा केला होता की हे दोघेही व्हिलन कसे होऊ शकतात? यांना टार्गेट का केलं जातंय? सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे ते आमदारांची बैठक बोलावत असतील तर त्यांची चूक काय? एकंदरीत पवार साहेबांपासून ही मंडळी तेथे आहेत, आजही तेथे होते. रोहित पवार विनाकारण टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असून आमच्या पक्षांतर्गत कार्यात लुडबुड करत आहेत”, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.
विलीनीकरणाबाबत भाजपाला विचारावं लागेल
ते पुढे म्हणाले, “विलीनीकरणाचा मुद्दा मी अनेकवेळा मांडला आहे. अजित दादा चर्चा करत होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नेता या चर्चेत नव्हता. त्यामुळे त्यांची चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही. दादा गेल्यानंतर ही परिस्थिती बदलली आहे. आता भाजपाला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचं मत घ्यावं लागले. सुनेत्रा वहिनी आणि कुटुंब याबाबत निर्णय घेतील.”

