Hasan Mushrif : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांमध्ये जाहीर होईल, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगानेच अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळही फोडल्याचं बोललं जात आहे. सध्या सर्वच नेते, राज्याचा दौरा, मतदारसंघाचा आढावा, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सभा, मेळावे घेत असल्याचं चित्र राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. महायुती सरकारने नुकतीच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची घोषणा केलेली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या एका विधानाची सध्या चर्चा रंगली आहे. "सरकारने इतक्या योजना आणल्या आहेत, आता घरात जेवण करायला सांगा तेही करू, पण मतदान महायुतीला करा", असं हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : Amol Kolhe : “तुम्ही चोरलं घड्याळ तरीही वेळ…”, अमोल कोल्हेंनी अजित पवारांना उद्देशून वाचलेली कविता चर्चेत हसन मुश्रीफ काय म्हणाले? "केसरी आणि पिवळ्या रेशन कार्डवर मोफत धान्य देण्याची योजना सरकारने सुरु ठेवलेली आहे. तसेच प्रत्येक सणाला सहा वस्तु फक्त १०० रुपयांना सरकार देतं. तसंच येणाऱ्या गणपती उत्सवालाही आता चणा डाळ, साखर, रवा, तेल, हे सुद्धा आपण देत आहोत. आता सरकारने येवढ्या मोठ्या योजना आणल्या आहेत. आता घरात जेवण करायला सांगा तेही आम्ही करू, पण मतदानावेळी फक्त महायुतीचं बटणं दाबा", असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते रविवारी एका कर्याक्रमात बोलत होते. जयंत पाटील काय म्हणाले? हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देत खोचक टीका केली आहे. जयंत पाटील म्हणाले, "सत्ताधारी काहीही घोषणा करतील. आता आमच्या घरी म्हणजे जनतेच्या घरी जेवण करण्यासाठी येण्याची त्यांची तयारी आहे. म्हणजे हे किती घाबरलेले आहेत, आता हे किती शरण जायला लागले आहेत. त्यांचं सरकार जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे आता ते जेवण तयार करायला घरी येतो असं म्हणायला लागले आहेत. उद्या अंघोळ घालायलाही येतील", अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर केली.