Hasan Mushrif angry at Uttam Jankar : "मी वेशांतर करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच्या १० बैठकांसाठी दिल्लीला गेलो होतो", असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवारांच्या या दाव्यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी शेलक्या शब्दात पवारांवर टीका केली आहे. "देशातील नेतेच वेश बदलून प्रवास करत असतील तर विमानप्रवास किती सुरक्षित आहे?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. "एकनाथ शिंदे देखील मौलवीचा वेश धारण करून अमित शाह यांना भेटायला जायचे. त्यामुळे अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा, त्यांचे पासपोर्ट जप्त करायला हवेत", असंही राऊत म्हणाले. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटातील नेते व राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफ म्हणाले, पासपोर्ट जप्त करायला ते काय परदेशात गेले होते का? हसन मुश्रीफ म्हणाले, "ते (संजय राऊत) रोज सकाळी नऊ वाजता येऊन काहीही बोलत बसतात. कधी एकनाथ शिंदेंबद्दल बोलतात तर कधी अजित पवारांबद्दल बोलतात. त्याला आपण काय करणार? तसेच त्यांचा पासपोर्ट जप्त करायला ते काय परदेशात गेले नव्हते. अजित पवार यांनी केवळ त्यांच्या मनातील भावना सांगितल्या होत्या." राज ठाकरेंच्या अजित पवारांवरील टीकेला मुश्रीफांचं उत्तर दरम्यान, सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना अजित पवारांवर टीका केली होती. "अजित पवार पुण्यात आले नाहीत, तरी धरणाला पूर आला", असं राज ठाकरे म्हणाले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले, "आमच्या नेत्याबद्दल विरोधकांच्या मनात किती धास्ती आहे, ते त्यांच्या वक्तव्यांवरून दिसतंय. आमचा नेता किती लोकप्रिय आहे त्याची ही सगळी उदाहरणं आहेत." हे ही वाचा >> Nana Patole : “काँग्रेसमध्ये नानाभाऊ-विजयभाऊ; एकमेकांना फाडून खाऊ अशी स्थिती”, जुन्या सहकाऱ्याची बोचरी टीका जानकरची लायकी आहे का? : मुश्रीफ दुसऱ्या बाजूला, उत्तम जानकर यांनी देखील अजित पवारांवर टीका केली होती. "अजित पवार हे पाऊस आल्याचं पळून जाणाऱ्या बिबट्यासारखे आहेत", असं जानकर म्हणाले होते. त्यावर मुश्रीफांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "कोणीही काहीही बोलावं का? त्या उत्तम जानकरची अजित पवारांबद्दल बोलायची लायकी आहे का? विनाकारण कोणीही उठावं, काहीही बोलावं… आणि तुम्ही प्रसारमाध्यमांनी ते दाखवावं, हे दुर्दैवी आहे."