वाई : साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अचानक शासनाने तडकाफडकी बदली केली आहे. साताऱ्यातील प्रतापगड येथील अफजल खान कबर, महाबळेश्वर येथील व कास पठारावरील अनधिकृत बांधकामे हटविणे आदी संवेदनशील कामांमध्ये खंबीर भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. त्याबद्दल राजकीय लोकांच्यात नाराजीचा सूर होता. मात्र जनतेमध्ये ते फारच लोकप्रिय झाले होते. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाबळेश्वर पाचगणी कास मॅप्रो गार्डनबाबत घेतलेली कडक भूमिका, तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नाराजीचे कारण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची दहा महिन्यांपूर्वी साताऱ्याला बदली झाली होती. दोनच दिवसांपूर्वी रुचेश जयवंशी यांचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच गौरव केला होता. असे असताना त्यांची तडकाफडकी बदली झाल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. दरम्यान, जयवंशी यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आरोप केला होता, तर पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्यावर नाराज होते, अशीही चर्चा साताऱ्यात सुरू आहे.




हेही वाचा – “ऐकलं तर ठिक, नाहीतर…”, कोल्हापुरातील तणावारून मनसेचा कडक इशारा
शेखर सिंह यांच्या जागी ते आले होते. त्यांनी जिल्ह्यात पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. सर्वसामान्य जनतेत जाणारा जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. कास महोत्सवाचे आयोजन असेल कासवरील कुंपण हटविण्याचे काम असेल, प्रतापगड येथील अफझल खानाच्या अतिक्रमण हटवण्यासाठी राबविण्यात आलेली मोहीम, तसेच नुकतीच सुरू केलेली महाबळेश्वर येथील कारवाई आदी संवेदनशील कामांमध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कठोर भूमिका घेतली होती, यामुळे रुचेश जयवंशी जिल्ह्यात जनतेमध्ये लोकप्रिय झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचेही चांगले संबंध होते. असे असताना त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
राजकीय दबावाने बदली
राजकीय दबावाने सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची बदली झाल्याने जिल्ह्यात नाराजीचा सूर उमटला आहे. या बदलीचा जाहीर निषेध करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले. सध्या चालू असलेली महाबळेश्वरमध्ये अतिक्रमण विरोध मोहीम व येणाऱ्या काळात कास अतिक्रमणावर पडणारा हातोडा याचाच लोकप्रतिनिधी यांनी धसका घेतल्याने सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली करणाऱ्या मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सांगितले.