सांगली : समाजात द्वेष निर्माण करण्याचे होत असलेले प्रयत्न परस्पर संवादाच्या माध्यमातूनच दूर होऊ शकतील, असे मत महात्मा गांधींचे वंशज तुषार गांधी यांनी मिरजेत झालेल्या एक संवाद या कार्यक्रमात व्यक्त केले. मिरजेतील डॉ. परमशेट्टी विश्वस्त संस्था व न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त एक संवाद या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी किसान पुत्र आंदोलनाचे जेष्ठ कार्यकर्ते अमर हबीब यांनीही शेतकऱ्यांच्या सद्य:स्थितीबाबत संवाद साधला. या वेळी जलबिरादरीचे डॉ. रवींद्र व्होरा यांचीही प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. विनोद परमशेट्टी यांनी स्वागत केले.
श्री. गांधी म्हणाले, समाजात दुही माजवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे, त्याला रोखण्यासाठी परस्पर संवाद साधण्याची गरज आहे. काही लोकांचे विचार वेगळे असू शकतील, मात्र ते विचार प्रतिगामी आहेत, हे पटवून देण्यासाठी संवादच महत्त्वाचा ठरू शकतो. मिरज हे संघाचे बलस्थान असल्याने माझा संवाद होणार नाही असे काहींनी सांगितले. कार्यक्रमाला काही संघनिष्ठ व भाजपचे लोक आले असल्याचेही समजले. मात्र, त्यांच्याशी संवाद साधून माझे विचार त्यांना पटवून देण्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात.
महात्मा गांधीनी सुरू केलेल्या सत्याग्रहामध्ये सामान्य लोक सहभागी झाले होते. त्यामुळेच हे आंदोलन दीर्घकाळ टिकले. स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी आहुती दिली. काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत काहीच केले नाही हा आरोप चुकीचा असून पुराणातील उदाहरणे देऊन शल्यचिकित्सा, हवाई पर्यटन होत असल्याचे सांगितले जात असले तर हे ज्ञान बंदिस्त का झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दांडीचा मीठ सत्याग्रह आणि चंपारण्याचा लढा हा महात्मा गांधींनी शेतकऱ्यांसाठी सुरू केला होता असेही त्यांनी सांगितले.
