तौक्ते वादळात गटारांची झाकणे उखडली

तौक्ते वादळात वसई-विरार महापालिका परिसरात अनेक ठिकाणी पूरस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला.

पावसाळ्याच्या तोंडावर अनेक ठिकाणी चेंबर तुटल्याने अपघाताचा धोका

विरार: तौक्ते वादळात वसई-विरार महापालिका परिसरात अनेक ठिकाणी पूरस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला. अनेक गटारे उघडी झाल्याने अधिक धोकादायक बनली . पावसाळा सुरू झाला तरी महापालिकेने शहरातील गटारांची दुरुस्ती केली नाही. त्यांवर झाकणे बसवलेली नाहीत, तर काही गटारांचे चेंबर तुटले आहेत. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. पहिल्याच वादळी वाऱ्याने आणि पावसाने शहरातील उघडय़ा गटारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वसई-विरार शहरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून वसई जलमय होत असते. शहरातील रस्त्यांना अक्षरश: तलावाचे स्वरूप येत असते. त्यामुळे रस्ता कुठला आणि गटार कुठले हा फरक कळत नाही. यातील सर्वात मोठा धोका उघडय़ा गटारांचा आहे. दरवर्षी या उघडय़ा गटारांमुळे अनेक जण अपघाताचे बळी ठरले तरीसुद्धा महापालिका उघडय़ा गटारांच्या बाबतीत सतर्कता बाळगत नसल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसापूर्वी पडलेल्या तौक्ते वादळामुळे निर्माण झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक सखल भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. सर्वच गटारे तुडुंब भरून वाहत होती. यावेळी अनेक ठिकाणी गटारांवरील झाकणे नसल्याने अनेकांचे गटारात पडून अपघात झाले आहेत. नालासोपारा पूर्व सेन्ट्रल पार्क रस्ता पूर्ण दोन दिवस पाण्याखाली होता यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटांवर झाकणे नसल्याने नागरिकांनी त्यात काठय़ा रोवून नागरिकांची सुरक्षा केली.

महापालिका क्षेत्रात अनेक गटारांची कामे अर्धवट पडली आहेत, त्यात गटारावर आर सी सी बांधकाम करणे, नाल्यांची रुदीकरण करणे, नाल्यांची खोली वाढवणे अशी अनेक कामे अर्धवट पडून आहेत, अनेक ठिकाणी बांधकामासाठी लागणारे साहित्य रस्त्यांवर पडून आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने सर्वांचीच दैना उडवली आहे.

नालासोपारा अग्रवाल, लिंक रोड, वंसत नगरी, ‘डी’ मार्ट, तुळींज अलका पुरी प्रगती नगर, ओसवाल नगरी  या जागांवर नाल्याचे काम सुरु करण्यात आले होते पण अजूनही हे काम पूर्ण झाले नाही आहे.

दर वर्षी वसई-विरार महापालिका गटार निर्मिती, दुरुस्तीवर ५० कोटी खर्च करते. पण यावर्षी करोनामुळे या खर्चावर कपात आली आहे. परंतु अजूनही शहरातील शेकडो गटारे उघडी आहेत. अनेक गटारांची झाकणे जीर्ण होऊन फुटली आहेत. तर अनेक गटारांना झाकणे कधीच लागली नाहीत. शहरातील अनेक परिसरात गटाराचे झाकणे उघडी किंवा तुटलेल्या अवस्थेत आहेत. स्थानिक नागरिकांनी अपघात होऊ नये म्हणून त्यावर लाकडी फळ्या, अथवा बांबू टाकत आहेत. कोटय़वधीची तरतूद असूनसुद्धा अजूनही पालिकेने गटारांची कामे केली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरातील गटारांच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. लवकरच सर्व गटारांची कामे पूर्ण केली जातील

– राजेंद्र लाड, मुख्य अभियंता, बांधकाम विभाग, वसई-विरार महानगर पालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: He gutter cover was torn off in the storm ssh

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या