scorecardresearch

चंद्रपुरातील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रावर कारवाई ; तीस दिवसांसाठी गर्भपात केंद्र निलंबित

ही कारवाई चंद्रपूर शहर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे करण्यात आली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

चंद्रपूर : अभिलेखांची देखभाल न केल्याने पीसीपीएनडीटी व वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत बाबुपेठ येथील डॉ. सौ. शरयू सुधाकर पाझारे यांच्या पाझारे नर्सिग होम येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी क्रं. १७८०चे नोंदणी प्रमाणपत्र ३० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई चंद्रपूर शहर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे करण्यात आली आहे. सदर केंद्राची नोंदणीकृत सोनोग्राफी मशीन सील करण्यात आली आहे. १३ मे रोजी झालेल्या पीसीपीएनडीटी सल्लागार समिती बैठकीतील निर्णयानुसार मनपा आरोग्य विभागामार्फत सदर वैद्यकीय गर्भपात केंद्राची तपासणी करण्यात आली, तपासणीत अभिलेखांची देखभाल न केल्याचे आढळुन आले होते. त्यामुळे पाझारे नर्सिग होम यांचे वैद्यकीय गर्भपात केंद्र नोंदणी प्रमाणपत्र १८ मेपासुन निलंबित करण्यात आले आहे. या कालावधीत पाझारे नर्सिग होम येथील वैद्यकीय गर्भपात केंद्र हे कायमस्वरूपी बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. बंदी करण्यात आलेल्या कालावधीत वैद्यकीय गर्भपात केंद्रासंबंधी काही प्रकार घडल्यास किंवा सदर घटना पुन्हा उपरोक्त संदर्भात घडल्यास कायद्यान्वये मनपाकडून प्रशासकीय कार्यवाही केली जाईल, अशी ताकीद देण्यात आली आहे तसेच वैद्यकीय गर्भपात केंद्रात आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करून त्यासंबंधीचा अहवाल मनपा आरोग्य विभाग येथे सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर मनपा आरोग्य विभागाकडून फेरतपासणी करण्यात येईल व त्यानंतरच वैद्यकीय गर्भपात केंद्र पुर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health department action on sonography and medical abortion center at chandrapur zws

ताज्या बातम्या