आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला घेतली जाणारी लेखी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतपाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. शिवाय, भाजपाने देखील या मुद्य्यावरून सरकारवर जोरादार टीका सुरू केली आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षांसंदर्भात आज महत्वपूर्ण माहिती दिली. या परीक्षांच्या नव्या तारखा निश्चित झाल्या असल्याची त्यांनी सांगितले असून, त्यानुसार आता गट – क संवर्गाची परीक्षा २४ ऑक्टोबर व गट – ड संवर्गाची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय आज (सोमवार) आरोग्य विभाग व न्यासा कंपनीच्या अधिकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत झाला आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, ”कोणताही धोका न पत्करता या दोन्ही दिवशी रविवार असल्याने, शाळा शंभर टक्के उपलब्ध होतातच. या अनुषंगाने या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. बैठकीत अन्य बाबींवर देखील चर्चा झाली. त्यामध्ये डॅशबोर्ड केला पाहिजे, त्यावर सगळ्या परीक्षा केंद्रांची यादी दिली पाहिजे, विद्यार्थ्यांची यादी डॅशबोर्डवर दर्शवली गेली पाहिजे. हे त्यांनी एक वेळापत्रक देऊन एक साधारणपणे १ ऑक्टोबरला त्यांनी डॅशबोर्ड द्यावा. संपूर्ण विद्यार्थ्यांची व परीक्षा केंद्रांची यादी त्यांनी दिली पाहिजे. याशिवाय त्या संबंधित शाळांनी देखील या परीक्षा केंद्रांना मान्यात दिलेली असलं पाहिजे. त्यामुळे योग्यप्रकारे ऑडिट करण्याचं काम होईल. त्यांना असं बंधनकारक केलं आहे जे अगोदर देखील केलेलं होतं की, ९ दिवस अगोदर सर्व परीक्षार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले पाहिजेत.याबाबत देखील खात्री केली जाईल.

तसेच, ”मला एवढचं सांगायंचं आहे की कुणीही कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी वेळोवेळी दिलेल्या आहेत. कोणालाही कुठेही काही चुकीचा प्रकार होत असल्याचं आढळलं, तर त्यांनी तत्काळ थेट पोलिसांना संबंधितांचं नाव कळवावं व त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम करावं. परीक्षा अत्यंत पारदर्शकचं व्हायला हव्यात. कुठेही गडबड होणार नाही याची काळजी घेण्याचं काम आम्ही करत आहोत.” असंही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितलं.

काल माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले होते की, ”परीक्षा केवळ पुढे ढकलल्या आहेत आणि परीक्षा पुढे का ढकलल्या याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. मला असं वाटतं की विद्यार्थी हीत हाच त्यामधला महत्वाचा विषय होता. शेवटी एक असतं की, काही थोड्याफार विद्यार्थ्यांवर जर देखील कुठं अन्याय झाला किंवा त्यांना वंचित रहावं लागलं. तरी देखील ते निश्चतपणे चुकीचं आहे, अन्यायकारक आहे. म्हणूनच या मागची ही भूमिका लक्षात घेऊनच ही गोष्ट केली आहे. न्यासा कंपनीची असमर्थता हेच त्यामागचं कारण होतं. त्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे.”

आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नाही, तर पुढे ढकलली आहे – टोपे

आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला लेखी परीक्षा घेतली जाणार होती. राज्यातील १५०० केंद्रांवर एकाच वेळी ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जाणार होती. परीक्षेचे नियोजन आधीच केले असतानाही परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीकडून विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी ओळखपत्र देण्यात आले. या ओळखपत्रांमध्ये अक्षम्य चुका होत्या. काही विद्यार्थ्यांचे ओळखपत्रच डाऊनलोड होत नसल्याने त्यांना ई-मेलवर नाव आणि परीक्षा केंद्र व बैठक क्रमांक पाठवण्यात आले. मात्र, परीक्षेच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना या ई-मेलच्या आधारे परीक्षा देता येईल का, असा प्रश्न होताच. या ई-मेलवरही अनेक चुकीचे केंद्र देण्यात आले होते. शुक्रवारी रात्रीपर्यंत ओळखपत्रांचा हा सगळा गोंधळ सुरूच राहिल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे अखेर परीक्षाच पुढे ढकलण्यात आली आहे.