राज्याच्या आरोग्य खात्याच्या वतीनेच वैद्यकीय शिक्षण देण्याचा विचार आहे. तसा प्रस्ताव बनवून राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात येईल असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बोलताना सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ जिल्हा घोषित करून आरोग्य पायाभूत सुविधांचा प्रस्तावही मंजुरीसाठी कॅबिनेटसमोर ठेवल्याचा विचार त्यांनी स्पष्ट केला. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना येथील विश्रामगृहावर बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदाळे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले.
वैद्यकीय शिक्षण आरोग्य मंत्रालयामार्फतच सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे आरोग्य खात्याला लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटेल असे डॉ. सावंत यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात डॉक्टर येण्यास तयार नाहीत. या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या अभावाचे त्यामागे एक कारण आहे, म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग डोंगराळ जिल्हा घोषित करून आरोग्य सुविधा देण्यासाठी एक प्रस्ताव बनविला जात आहे असे डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्यात लागणाऱ्या डॉक्टरांसाठी २१९८ जणांच्या मुलाखती घेऊन ६४० डॉक्टरांना नेमणुका दिल्या आहेत. तसेच राज्यातील रुग्णालयातून १५५ डॉक्टर बेपत्ता आहेत. त्यांना निलंबित करण्यात आल्याचे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. आपण गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयाची बायोमेडिकल वेस्टच्या  प्रकल्पाची आजच पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थीना गोवा मेडिकल रुग्णालयात सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न आहे. मात्र या संदर्भातील करारासाठी १ जुलैपर्यंत थांबावे लागणार आहे असे त्यांनी सांगताना राज्यातील आरोग्य खात्यात सुधारणा करण्यासाठी किमान एक वर्षांचा कालावधी हवा असे डॉ. दीपक सावंत म्हणाले.  प्रत्येक तालुक्यात मुंबईतील प्रसिद्ध हॉस्पिटलातील सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांना पाठवून रुग्णांना सिंधुदुर्गात सेवा देणे तसेच जिल्ह्य़ातील रुग्णांचा सव्‍‌र्हे करणे विचाराधीन आहे असे डॉ. दीपक सावंत म्हणाले. सिद्धिविनायक ट्रस्टमार्फत डायलेसिस मशीन मिळणार आहेत तसेच राज्यातील नेट्रॉलॉजिस्ट संघटनेच्या मार्फत बारावी व पंधरावीच्या विद्यार्थ्यांना डायलेसिस प्रशिक्षण देऊन त्यांचा उपयोग डायलेसिस ऑनलाईन सेंटर चालविण्याचा विचार डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केला. या संघटनेचे राज्यात १७०० डॉक्टर आहेत असे ते म्हणाले. सिंधुदुर्गनगरी व सावंतवाडीमध्ये डायलेसिस सेंटर सुरू आहे. आता देवगड, कणकवली व वैभववाडी येथे डायलेसिस सेंटरसाठी प्रस्ताव आहेत असे डॉ. सावंत म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात वर्ग १च्या ५० डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. जिल्ह्य़ात पायाभूत सुविधा असल्याने डॉक्टर येण्यास तयार नाहीत. मात्र आरोग्य सेवा देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यात स्पेशालिस्ट डॉक्टर आणून सेवा देतानाच रुग्णांचा सव्‍‌र्हे करण्याचा विचार आहे. तसेच वैद्यकीय कॅम्पही प्रत्येक तालुक्यात घेण्याचा प्रयत्न करू असे डॉ. दीपक सावंत म्हणाले. सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा सक्षम करून आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे असे त्यांनी सांगितले.