संदीप आचार्य, लोकसत्ता
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य विभागाने येत्या ९ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी रक्तदान मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३६६ रक्तपेढ्यांच्या माध्यमातून तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या दिवशी जास्तीतजास्त रक्त संकलन करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यव्यापी रक्तदान मोहीमेची संकल्पना मांडली असून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी रक्तपेढ्या तसेच रक्तदान क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ९ फेब्रुवारी रोजी राज्यभर रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग तसेच संबंधितांची बैठक घेऊन त्यात नियोजन करण्यात आले. यापूर्वी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ही महिलांच्या आरोग्य तपासणीची राज्यव्यापी मोहीम राबवली होती. यात सुमारे चार कोटी महिलांच्या आरोग्याची सर्वांगिण तपासणी करण्यात आली होती. यात ज्या महिलांना वेगवेगळ्या आजारांसाठी पुढील उपचाराची गरज आहे त्यांच्यासाठी नवीन योजना आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. याशिवाय राज्यातील अठरा वयोगटापर्यंतच्या मुलांची राज्यव्यापी तपासणी मोहीम आरोग्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून अंमलात येत आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाची सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये महिन्यातून एक दिवस विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत राज्यभर रक्तदान शिबीरे भरविण्या येणार आहे. यातून साधारणपणे वीस हजार रक्ताच्या पिशव्या जमा होतील, असा विश्वास आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केला.
राज्यात शासकीय व निमशासकीय मिळून ७५ रक्तपेढ्या आहेत तर धर्मादाय संस्थांच्या तसेच खासगी व रेडक्रॉस सोसायटीच्या मिळून ३६६ रक्तपेढ्या आहेत. याशिवाय राज्यात ३३२ रक्तसाठवणूक केंद्रे आहेत. सामान्यता राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये लोकसंख्येच्या एक टक्का एवढे रक्त संकलित असणे अपेक्षित असते. गेल्या एक दशकाहून अधिककाळ ऐच्छिक रक्तदानात महाराष्ट्र हा देशात प्रथम क्रमांकावर आहे. करोनाकाळातही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करण्यात आले होते. २०२१ मध्ये राज्यात २८,९२६ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले व त्या माध्यमातून १६ लाख ७३ हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या होत्या. यात ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण हे ९८.८७ टक्के एवढे होते. २०२२ मध्ये ऑक्टबर अखेरपर्यंत राज्यात २६,३७३ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून १४ लाख ७९ हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांना विचारले असता, मधुमेह, रक्तदाब तसेच काही विशिष्ठ आजाराची व्यक्ती वगळता १८ ते ६५ वयोगटातील कोणीही रक्तदान करू शकतो. सामान्यपणे प्रत्येकाच्या शरीरात चार ते पाच लिटर रक्ताचा साठा असतो यातील केवळ ३५० मिलीलीटर रक्त रक्तदानाद्वारे घेतले जाते. रक्तदानासाठी सामान्यपणे दहा मिनिटांचा कालावधी लागतो. एका रक्तदानातून किमान चार जणांचा जीव वाचविण्यास मदत होऊ शकते असेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विचारले असता येत्या नऊ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय राज्यव्यापी रक्तदान मोहीम राबविण्यात येत असली तरी आगामी काळात आरोग्य विभागाच्या माध्यमातून रक्तदान चळवळ वाढण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येणार आहेत. प्रामुख्याने थॅलेसेमीया व सिकलसेलच्या रुग्णांसाठी पुरेसा रक्तपुरवठा उपलब्ध राहण्याची गरज असते. यासाठी ऐच्छिक रक्तदान चळवळ सशक्त करण्यासाठी रक्तदान क्षेेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्ती तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येईल. आरोग्य विभागाच्या माध्यमातून स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.