राज्य सरकारने सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला आहे. यासंदर्भात आदेश काढण्यात आला असून त्यानुसार आत्ता राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टोपे म्हणाले, “राज्यात आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनतेने यामध्ये खूप मोलाचं सहकार्य देऊन आपल्याला साखळी तोडण्यामध्ये सहकार्य करावं, हीच महत्वाची अपेक्षा आहे.”

Lockdown in Maharashtra : राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला!

तसेच, “आज सविस्तर तीन तास झालेल्या चर्चेत जे महत्वाचे निर्णय झाले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ऑक्सिजन संदर्भात, अत्यंत काटकसरीने ऑक्सिजनचा वापर करणे, म्हणजेच प्रत्येक रूग्णालयाने ऑक्सिज ऑडीट हे केलं पाहिजे. काही यशोगाथा या महाराष्ट्रातील आहेत तर काही इतर राज्यातील आहेत तर त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. लिकेजेसची दर चार -पाच तासांनी तपासणी केली पाहिजे.” असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

त्याचबरोबर “मला हे सांगायला समाधान आहे की राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केल्याप्रमाणे हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्लॅन्ट येणाऱ्या दहा दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये निर्माण होतील. हा देखील विश्वास मी या निमित्त व्यक्त करतो. एवढ्यावरच न थांबता ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स १० एमपीएचे ५ एमपीएमचे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रूग्णांच्या २५ टक्क्यांपर्यंत असलेच पाहिजे, असं देखील बंधनकारक केलं आहे.”  अशी देखील माहिती टोपेंनी यावेळी दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर बोलताना आरोग्यमंत्री टोपेंनी लॉकडाउन वाढवण्यासंदर्भातले संकेत दिले होते. राज्यात १५ दिवस किंवा त्याहून जास्त काळासाठी लॉकडाउन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्यानुसार आज राज्य सरकारने स्वतंत्र आदेश काढून राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध १५ मे पर्यंत कायम राहतील असं जाहीर केलं आहे.