scorecardresearch

विदर्भाला उष्ण लहरींचा धोका, वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईचं संकट उभं राहण्याची भिती

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ८ मे पासून विदर्भाला उष्ण लहरींचा धोका असणार आहे.

विदर्भाला उष्ण लहरींचा धोका, वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईचं संकट उभं राहण्याची भिती

यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भाच्या तापमानात प्रचंड वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. मार्च महीन्याच्या पहील्या आठवड्यापासूनच विदर्भातील तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. एप्रील महिन्यात तर तापमानाने उच्चांक गाठला होता. या मौसमातील राज्यातील सर्वात जास्त तापमानची नोंद एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. अजूनही पाऊस सुरू होण्यास साधारणपणे महिन्याभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे विदर्भाची जनता वाढत्या उष्माच्या कारणाने चिंतेत आहे. असं असतानाच आता हवामान खात्याने दिलेला इशारा विदर्भाची चिंता अधिक वाढवणारा आहे. सतत वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेस विदर्भातील रस्त्यांवर रहदारी कमी झाली आहे. उन्हामुळे दुपारच्या वेळेस लोकं घराबाहेर पडणं टाळत आहेत. 

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ८ मे पासून विदर्भात उष्ण लहरी धडकणार आहेत. त्यामुळे तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा निर्माण होणाऱ्या उष्ण लहरींमुळे मे महिन्यात तापमानाचा जुना उच्चांक मोडला जाण्याची शक्यता खगोल अभ्यासकांकडून व्यक्त केली जातआहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील मे महिन्यातील तापमानाचा जूना उच्चांक हा ४९ आणि ४८.२ अंश सेल्सिअस इतका नोंदवला गेला होता. उष्ण लहरी अश्याच कायम राहील्या तर यावर्षी हा उच्चांक मोडला जाऊ शकतो असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. विदर्भात सध्या राज्यातील सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

शुक्रवारी विदर्भात नोंदवलं गेलेलं तापमान

चंद्रपूर-   ४५.०२  अंश सेल्सिअस

ब्रम्हपूरी-  ४४.०० अंश सेल्सिअस

अकोला-  ४३.०७ अंश सेल्सिअस

अमरावती- ४३.०८ अंश सेल्सिअस

वर्धा-        ४४.०४  अंश सेल्सिअस

सतत वाढत्या तापमानामुळे विदर्भात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या साठ्यात घट झाल्याचं पहायला मिळालं आहे. अनेक ठिकाणी पाणवठ्यामधील पाणी आटल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आधिच उष्णतेनं बेजार झालेल्या लोकांना येत्या काळात पाणी टंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या सुरवातीपासूनच विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार उष्ण लहरींमुळेच तापमानात प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे उष्ण लहरींचा धोका लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-05-2022 at 14:54 IST

संबंधित बातम्या