उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात अनेक ठिकाणी दररोज निच्चांकी तापमानाची नोंद होत असतानाच, महाबळेश्वरमध्ये बुधवारी तापमानाने शून्य अंशांचा पारा गाठला. राज्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. या ठिकाणच्या वेण्णा लेक परिसरात आज किमान तापमान शून्य इतके नोंदविले गेले. तापमानाच्या या खालावलेल्या पाऱ्यामुळे संपूर्ण परिसरात सध्या दाट धुके पाहायला मिळत आहे. तर, उर्वरित महाबळेश्वरमध्येही पाच अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हा़डे गोठवून टाकणाऱ्या या थंडीमुळे लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले असले तरी, येथील पर्यटकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.