राज्यात थोड्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ३ दिवस महत्वाचे असून या भागांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा तडाखा बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात पुढील ३ दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर बुधवारी (२२ सप्टेंबर) राज्यात कमी- जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाची पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्याच्या घाट भागात गुरुवारपर्यंत (२३ सप्टेंबर) मुसळधार पाऊस पडेल. त्यानंतर, वातावरण अंशतः ढगाळ राहील. त्याचप्रमाणे, अति हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस कायम राहील.

२१ ते २३ सप्टेंबरदरम्यान तीव्रता वाढणार

येत्या ४८ तासात पश्चिम बंगाल परिसरावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, २१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरदरम्यान राज्यात पावसाची तीव्रता वाढ होणार आहे. २५ सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरात परत एक नवीन सिस्टिम निर्माण होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे.

भारतीय हवामान विभाग पुणेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या माहितीनुसार, पूर्व राजस्थानचं चक्रीवादळ आणि गुजरातच्या ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होत आहे. त्यामुळेच, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.”

राज्यात परतीचा पाऊस लांबणीवर

सप्टेंबर महिना संपत आला तरी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात परतीचा पाऊस लांबणीवर पडला असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.